यंदाच्या दुष्काळामुळे संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. जालना जिल्ह्यातील ७ हजार शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून ६०० मेट्रिक टन चार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील ७६६ गावांमध्ये चाऱ्याचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात चाराटंचाईवर मात करण्यासाठी मदत होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले.
मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत. प्रशासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
१८ ते २२ मार्च या काळात शेतकऱ्यांना चाऱ्याचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये चाऱ्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्यामुळे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मे महिन्यात चारा उपलब्ध झाल्यानंतर दिलासा मिळेल.
गाळ पेऱ्यातदेखील पेरणी
१) सध्या जिल्ह्यातील अनेक धरणे तसेच तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे गाळामध्ये चाऱ्याची पेरणी करण्यात येणार आहे. गाळपेऱ्यामध्ये चारापेरणी करण्याचे ठरवण्यात आले आहे.
२) यानुसार, १९८ गावांतील ३ हजार १२० लाभार्थ्यांना चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. गाळपेऱ्यातील १ हजार २४८ हेक्टर जमिनीवर चाऱ्याची पेरणी होणार आहे. ७४ हजार ८०० मेट्रिक टन चारा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आलेले आहे.
मे महिन्यात चारा मिळणार
• दहा दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील ७ हजार ७२८ शेतकऱ्यांना ११ हजार क्विंटल चाऱ्याच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. हा चारा उपलब्ध होण्यासाठी एक ते दीड महिन्याचा अवधी लागणार आहे.
• यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चाऱ्याची उगवण होणार आहे. यानंतर या चाऱ्याचे शेतकऱ्यांना वाटप येईल.
प्रशासनाकडून प्रयत्न
जिल्ह्यात चाराटंचाईची समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना चाऱ्याचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुबलक चारा उपलब्ध होईल. चाऱ्याचे पशुपालकांना वाटप करण्यात येणार आहे. - सोहम वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी