Join us

सकाळी धुके, दिवसभर ढग, दादा तूर हरभऱ्याला बघ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 1:40 PM

किडीचा धोका : वेळीच करा फवारणी

राज्यात  गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण व कमी तापमान असल्याने तुरीवर शेंगा पोखरणारी अळी व हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी वेळीच या किडीच्या जीवनक्रम लक्षात घेऊन अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे, असा सल्ला धुळे कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे.

ढगाळ वातावरणामुळे तूर व हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सध्या तुरीवर फुलोरा व शेंगा आहेत. तर हरभरा पिकाचे जोमात वाढत आहे. अशातचे मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांदूरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात, मोठ्या झालेल्या अळ्या शेंगा व घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन पोखरतात. एक अळी साधारणतः ३०-४० तूर व घाट्यांचे नुकसान करते. तुरीला शेंगा लगडल्या असून हरभरा जोमात असतानाच संकट ओढावलेयं.

...तर करावी लागणार दुसरी फवारणी

कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून साध्या (नॅपसॅक) पंपाने फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करावयाची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तीप्पट करावे. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसाचे अंतराने करावी.

पूर्व उपाययोजना काय कराव्या? 

  • उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात तसेच उन्हामुळे मरतात. गहू, मसुर, मोहरी, अथवा जवस आंतरपीक घेतल्यास अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. 
  • पिकावर या अळीच्या नियंत्रणासाठी तिचे नैसर्गिक शत्रू किटक म्हणजे शेतकऱ्यांचे मित्र कार्यरत असतात व ते आपल्या उपजीविकेतून घाटे अळीचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करीत असतात. पक्ष्यांनी शेतातील अळ्या वेचून खाव्यात यासाठी शेतात प्रती हेक्टर २० पक्षी थांबे उभारावे.

 

टॅग्स :हवामानपीक व्यवस्थापनपीक