जळगाव जिल्ह्यातील 274 गावांमधील 15 हजार 663 शेतकऱ्यांना केळी पिकावर झालेल्या सीएमव्ही (कुकुंबर मोझेक व्हायरस) रोगावर नुकसान भरपाई मिळणार आहे. 19 कोटी 73 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला असून त्याचा शासन निर्णयही जारी झाला आहे.
कुकुंबर मोजायक व्हायरस या रोगामुळे केळी या बहुवार्षिक पिकाच्या नुकसानासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची मदत देण्यात आल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
तत्कालीन वादळी पावसाच्या तडाख्याने केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेल्या केळी भागांवर व्हायरसचे नवीन संकट आले होते. या रोगामुळे एकूण बाधित झालेले क्षेत्र हे 8 हजार 771 हेक्टर;एवढे होते. जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना दोन हेक्टर च्या मर्यादेचा निकष पाळुन 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयातील सुधारित दर व निकषांप्रमाणे एकूण 19 कोटी 73 लाख एवढी मदत देण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेही अनिल पाटील म्हणाले.
लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.