राज्याच्या मुख्य सचिवपदी १९८७च्या तुकडीतील ज्येष्ठ आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली. हे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. पती व पत्नी दोघेही राज्याच्या मुख्य सचिवपदावर पोहोचले अशी महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे.
मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी राज्य सरकारने सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली. त्यांनी रविवारी सायंकाळी करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्या जून २०२५ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांचे पती मनोज सौनिक हे करीर यांच्याआधी राज्याचे मुख्य सचिव होते.
प्रशासन अन पोलिस प्रशासन महिलांकडेचप्रशासनाची धुरा आता सुजाता सौनिक यांच्याकडे तर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांच्याकडे आहे. प्रशासन आणि पोलिस प्रशासन या दोन्हींचे नेतृत्व महिलांकडे असल्याचा योग पहिल्यांदाच जुळून आला आहे.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची ओळख- सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या.- त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या टी.एच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ २०१८ मधील टेकमी फेलो आहेत.- त्यांनी २०१९ मध्ये सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्रोस विभागातील समस्या याविषयावर मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत फेलोशिप देखील पूर्ण केली आहे.- टेकमी फेलो म्हणून, महाराष्ट्राच्या विमा-आधारित आरोग्य सेवा या विषयावर अभ्यास करतांना केलेल्या संशोधनातून त्यांचा शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाला आहे.- अलीकडेच त्याचे सार्वजनिक आरोग्याचा दृष्टीकोन असलेले‘कुंभ नाशिक-त्र्यंबकेश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील झाले आहे.- त्यांनी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग (SDEED) चे अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) आणि राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक सुधारणांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.- ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटच्या अभ्यासातही त्यांचा सहभाग होता. ज्यामध्ये महिला व बाल विकास आणि शालेय शिक्षण या प्रमुख विभागांच्या कामकाजाचा सारांश त्यात मांडण्यात आला होता.- त्या मुंबई विद्यापीठ आणि SNDTWU, मुंबईच्या सल्लागार समितीवरही कार्यरत आहेत. तसेच सांघिक स्तरावरत्यांनी महिला व बाल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांमध्ये कंबोडिया व कोसोवोमध्ये UN च्या दोन मानवतावादी मोहिमांमध्ये काम केले आहे.- राज्यशासनात विविध पदांची जबाबदारी सांभाळत असतांना त्यांनी शाश्वत आणि पारदर्शक कामकाजावर नेहमीच भर दिला आहे.