Join us

पशुगणनेत प्रथमच 'मोबाइल ॲप'चा होणार वापर; पेपरलेस कामकाज कसे करणार पशुसंवर्धन विभाग वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 1:47 PM

राज्यात प्रथमच यंदा मोबाइल ॲपद्वारे २१ व्या पशुगणना केली जाणार आहे. वाचा सविस्तर

संतोष वानखडे

राज्यात प्रथमच यंदा मोबाइल ॲपद्वारे २१ व्या पशुगणना केली जाणार आहे. परंतू सुरुवातीलाच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने, पशुगणनेचा शुभारंभ लांबणीवर पडला आहे.राज्यात गौवंशीय, म्हैसवर्गीय पशुधन तसेच शेळी/मेंढी, कुत्रे, अश्व, कुक्कुट, वराह आदी जनावरे किती आहेत, याचा निश्चित आकडा माहिती होण्यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. 

सन २०१९ मध्ये विसावी पशुगणना ऑफलाइन पद्धतीने झाली होती. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून २१ वी पशुगणना १ सप्टेंबरपासून राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याची संपूर्ण तयारी झाली होती. पशुगणनेसाठी प्रगणक व पर्यवेक्षकांवर जबाबदारीदेखील निश्चित करण्यात आली. 

या पशुगणनेच्या कार्यवाहीत ऐनवेळेवर तांत्रिक अडचणी उद्भवल्याने १ सप्टेंबरचा मुहूर्त टळला. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून जिल्हास्तरीय यंत्रणेला पशुगणनेसाठी सुधारित वेळापत्रक दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

'पेपरलेस' कामकाज

पशुगणनेसाठी प्रथमच 'मोबाइल ॲप'चा वापर करण्यात येणार आहे. पूर्णपणे 'पेपरलेस' असलेल्या या पशुगणनेसाठी राज्यभरात प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले.

पूर्वीची नोंदवही आता बाद

यापूर्वी पशुगणना करण्यासाठी नोंदवहीचा आधार घेतला जात होता. नोंदवहीत अनेक रकाने होते. ते भरताना बराच वेळ जात असे. ही गैरसोय टाळण्यासाठी व पशुगणनेत सुसूत्रता आणण्यासाठी यंदा एका विशिष्ट ॲपची निर्मिती करण्यात आली. या ॲपसाठी विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पशुधनाची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविली जाणार आहे.

यंदा देशभरात प्रथमच मोबाइल ॲपद्वारे २१ वी पशुगणना होणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप पशुगणनेला सुरुवात झाली नाही. पशुगणनेसाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज आहे. - डॉ. अरुण यादगिरे, प्रभारी उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, वाशिम

टॅग्स :शेती क्षेत्रमोबाइलशेतकरीशेतीप्राण्यांवरील अत्याचार