मागील पाच ते सात वर्षांपासून कमी व अवेळी पडणाऱ्या पावसामुळे गोदावरीनदी पावसाळ्यात कधीही ओसंडून वाहिली नव्हती. पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले तरच गोदावरीनदीमध्ये पाणी दिसून येत होते. मात्र, यंदा दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी प्रवाहित झाली आहे. नदीचे पात्र पाण्याने तुडुंब भरले आहे.
गेल्यावर्षी कमी पावसामुळे पैठण येथील जायकवाडी धरण पन्नास टक्के देखील भरू शकलेले नव्हते. यावर्षीची प्रखर उष्णता, कडक ऊन यामुळे जायकवाडी धरणात केवळ पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात जर पाऊस वेळेवर व समाधानकारक पडला नसता तर १९७२ मधील दुष्काळासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती.
दरम्यान, यंदा एप्रिल महिन्यात गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, मे महिन्यात गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडून वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यामुळे बळेगाव (ता. अंबड) ते कोठाळा (ता. अंबड) या गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला पंधरा दिवस पाऊस उशिरा पडला असता तर उसाचे पीक वाळून जाण्याची भीती वर्तविण्यात येत होती. परंतु, यंदा वेळेवर पाऊस पडला असून, या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दमदार पावसाचा परिणाम
• ३ जून रोजी पावसाने अंबड तालुक्यातील शहागडसह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. यानंतर पुन्हा ७ जून रोजी देखील जोरदार पाऊस झाला. यानंतर दररोज पाऊस पडत आहे. ज्यामुळे सात वर्षांत पहिल्यांदाच पैठण ते कोठाळा हे ७० किलोमीटरचे नदीपात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नदीच्या काठावरील पाण्याच्या विद्युत मोटरी व साहित्य वाहून जाण्याच्या भीतीने उचलून घरी नेण्याची वेळ आली आहे.
• पाऊस पडल्याचे समाधान मात्र या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.