आगामी खरीप हंगामासाठी 'महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ' अर्थातच 'महाबीज' ने कंबर कसली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात 'महाबीज' ने ५ हजार ४७० हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित केला आहे. या हंगामासाठी शेतकऱ्यांना पायाभूत आणि प्रमाणित बियाणे पुरवठ्याची पूर्ण तयारीही 'महाबीज' ने केली आहे.
वाशिम जिल्ह्यात दरवर्षी महाबीज कडून खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मुग, उडीद, ज्युट आदी बियाण्यांच्या उत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. यंदाही 'महाबीज' ने खरिपाची पूर्ण तयारी केली आहे. या हंगामात ६९ हजार २७३ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट असल्याची माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. सावरकर यांनी दिली.
या हंगामातही जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये दरवर्षी खरीप हंगामात नी सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्यूट या पिकांच्या वेगवेगळ्या वाणांचा प्रमाणित व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या प्रस्तावित पा बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये ही सर्वाधिक प्रमाण सोयाबीन या पिकाच्या बीजोत्पादनाचे क्षेत्र आहे.
बीजोत्पादनात कोणत्या वाणांचा समावेश?
यंदाच्या हंगामात महाबीजने सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात जेएस २०- ११६, जेएस- ३३५, जेएस ९३०५, केडीएस ७५३, एमएसीएस- १२८१, १४६०, एमएयूएस- १५८, १६२, ७१, ७२५, पीडीकेव्ही अंबा, फुले दुर्वा, फुले संगम, सुवर्ण सोया सादि वाणांचा समावेश आहे. मुंग बिजोत्पादनात बीएम २००३-२, फुले चेतक, उत्कर्षा आदि वाणांचा, तुरीच्या बिजोत्पादनात बीडीएन-७१६, आयसीपी ८८६३ आदि वाणांचा, उडदाच्या बिजोत्पादनात एकेयू १०-१, टीएयू-१ या वाणांचा, तर ज्युट बिजोत्पादनात जेआरओ- ५२४ या वाणांचा समावेश आहे.
तालुकास्तरावरील क्षेत्रीय कार्यालयात नोंदणी सुरु
• यंदाच्या खरीप हंगामातील बिजोत्पादन कार्यक्रमासाठी वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील महाबीजच्या क्षेत्र अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांची अग्रीम आरक्षण नोंदणी सुरु करण्यात आली.
• महाबीजच्या बिजोत्पादन कार्यक्रमात अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.
५,३८८ हेक्टरवर सोयाबीन बीजोत्पादन
यंदाच्या खरीप हंगामात महाबीजकडून सर्व बियाणे मिळून ५ हजार ४८७० हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित केला आहे. त्यात सोयाबीनचे क्षेत्र ५ हजार ३८८ हेक्टर राहणार असून, यात प्रमाणित दर्जाच्या सोयाबीन बिजोत्पादनाचे क्षेत्र ४ हजार ४७ हेक्टर, तर पायाभूत सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमाचे क्षेत्र १ हजार ३४१ हेक्टर आहे.
कोणत्या बियाण्यांचे किती हेक्टर बीजोत्पादन?
• सोयाबीन (प्रमाणित दर्जा) - ४०४७
• सोयाबीन (पायाभूत) - १३४१
• मुग (प्रमाणित दर्जा) - १५
• तूर (प्रमाणित दर्जा) - ३४
• उडिद (प्रमाणित दर्जा) - १३
• ज्युट (प्रमाणित दर्जा) - २०
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात महाबीजकडून एकूण ५ हजार ४७० हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे. या बीजोत्पादन कार्यक्रमासाठी सहाही तालुक्यात महाबीजच्या कृषी क्षेत्र अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांची अग्रीम आरक्षण नोंदणी सुरु आहे. या कार्यक्रमात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी निर्धारित मुदतीत संपर्क साधावा. - एस. एस. सावरकर, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज
हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी