Join us

पेरणी पद्धतीसह वाणाच्या निवडीसाठी;ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद ठरतोय फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 9:02 PM

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या वतीने ऑनलाइन शेतकरी- शास्त्रज्ञ कृषी संवाद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी फायदेशीर ठरत आहे.

परभणी : पिकांच्या वाणांची निवड, पेरणी पद्धती आणि पेरणीची वेळ याबद्दलच्या पेरणीपूर्व नियोजनाची अचूक माहिती मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकाच वेळी देण्यात आली.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या वतीने मागील सहा महिन्यांपासून सुरू करण्यात आलेला ऑनलाइन शेतकरी- शास्त्रज्ञ कृषी संवाद दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या मदतीसाठी फायदेशीर ठरत आहे. शनिवारी या ऑनलाइन संवादात २०० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितार्थ वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने मागील सहा महिन्यांपासून प्रकल्पांतर्गत क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद सुरू करण्यात आला आहे.

या संवादातून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील वाणांची निवड, घ्यावयाची पिके व त्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती देण्यात येत आहे.

४ ऑक्टोबर रोजी या ऑनलाइन संवादाच्या चौदाव्या भागात शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील ज्वारी आणि हरभरा या पिकांच्या वाणांची निवड, पेरणी पद्धती, पेरणी व याबद्दलच्या पेरणीपूर्व नियोजनाची अचूक माहिती शास्त्रज्ञांच्या वतीने देण्यात आली.

या संवादात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील २०० हून अधिक शेतकरी सहभाग नोंदविला. ही संख्या १ हजार शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा मानस विद्यापीठ प्रशासनाचा आहे. त्यामुळे कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेला ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषी संवाद शेतकऱ्यांच्या हितार्थ ठरत आहे.

कुलगुरूंकडूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांद्वारे सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ संवादाअंतर्गत सर्व शास्त्रज्ञ, कृषीतज्ज्ञ त्याचबरोबर कुलगुरू डॉ. इंद्र मणी हे सहभागी होतात. विशेष म्हणजे हळद, कापूस, सोयाबीन व आगामी रब्बी हंगामातील उद्भवणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुलगुरू स्वतः उत्तरे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आपल्या प्रश्नाची माहिती मिळताना सुसूत्रता येते.

शास्त्रज्ञांनी नोंदविला सहभागशनिवारी(५ ऑक्टोबर) रोजी शास्त्रज्ञांनी नोंदविला होता सहभाग. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्यासह तांत्रिक सत्रात हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आठवड्याच्या हवामानाचा अंदाज सांगून शेतीमध्ये करावयाच्या कामाच्या नियोजनाबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कृषी विद्यावेत्ता अरुण गुट्टे, डॉ. प्रीतम भुतडा, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, डॉ. अनंत लाड यांच्यासह आदी शास्त्रज्ञांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

टॅग्स :शेती क्षेत्ररब्बीकृषी विज्ञान केंद्रपरभणीशेतकरीशेती