Join us

चारा पीक घ्यायचे आहे ! मग हा प्रथिने युक्त घास करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 11:52 AM

लसूण घास हे द्विदलवर्गीय पीक असून ६० ते ९० से.मी. ऊंचीपर्यंत वाढते. योग्य व्यवस्थापन केल्यास लसूण घासापासून वर्षभर भरपूर, सकस अश्या हिरव्या चार्‍याचे उत्पादन मिळते.

लसून घास या पिकास ‘अल्फा – अल्फा’ असेही म्हणतात. हा एक ‘अरेबीक’ शब्द असून त्याचा अर्थ ‘सर्वोकृष्ट’ असा आहे. हे पीक अत्यंत पौष्टिक व बारमाही कडधान्य पीक असून त्यात प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. उदा.- जीवनसत्व- अ आणि ड. यामुळेच लसूण घास या पिकास ‘चारा पिकांची राणी’ असे म्हटले जाते.

लसूण घास हे द्विदलवर्गीय पीक असून ६० ते ९० से.मी. ऊंचीपर्यंत वाढते. योग्य व्यवस्थापन केल्यास लसूण घासापासून वर्षभर भरपूर, सकस अश्या हिरव्या चार्‍याचे उत्पादन मिळते. थंड हवामान या पिकास चांगले मानवते, म्हणून या पिकाची लागवड ऑक्टोंबर ते नोव्हेंबर दरम्यान करावी. जनावरांना प्रमाणपेक्षा जास्त लसुन घास (कोवळ्या अवस्थेत) दिल्यास, जनावरांमध्ये पोटफुगीचा त्रास होण्याची शक्यता असते, ते टाळण्यासाठी ५०% फूलोर्‍यातील अवस्थेत कापणी करावी व त्याचबरोबर वाळलेला चारा देणेही आवश्यक आहे.

जमीन व हवामान – लसूण घास हे पीक काळ्या कसदार परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणार्‍या जमिनीपासून ते मध्यम प्रतीच्या पोयटायुक्त जमिनीत सुद्धा घेता येते. या पिकास थंड हवामान पोषक असते तसेच उष्ण व कोरड्या हवामानात सुद्धा हे पीक वाढू शकते. आम्लयुक्त जमिनीत या पिकाचे उत्पादन कमी येते कारण अशा जमिनीत बियांची उगवण एकसारखी न होता सुरवातीलाच लसूण घासाच्या नांग्या (गॅप) पडतात त्यामुळे कालांतराने एकूण झाडांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते.

पूर्व मशागत – हे पीक किमान तीन वर्ष ठेवता येते. या करिता एक खोल नांगरट करून कुळवाच्या पाळया घालून ढेकळे फोडून जमीन मऊ व भूसभुशीत करावी जेणे करून त्यात हवा खेळती राहण्यास मदत होईल. जास्त पावसाच्या प्रदेशात व काळ्या कसदार जमिनीत वरंबे प्रमाणापेक्षा जास्त उंच ठेवू नयेत. कारण पावसाळ्यात वाफ्यामध्ये पाणी साचून राहते व घासाच्या रोपांची मर होऊन पीक विरळ होते. मध्यम ते कमी पावसाच्या प्रदेशात वाफे करताना वरंबे नेहमी पेक्षा थोडे रुंद व उंच ठेवावेत. 

बीज प्रक्रिया – एक हेक्टर क्षेत्रावर घासाची पेरणी करताना ४ लीटर पाण्यात सुमारे ५०० ग्रॅम गुळ मिसळावा. हे मिश्रण उकळून थंड करावे आणि त्यात रायझोबियम जिवाणू संवर्धक खताची ३ पाकिटे (२५० ग्रॅम प्रत्येकी) मिसळावी. सदर मिश्रण पुरेशा बारीक चाळलेल्या मातीत चांगले मिसळून घ्यावे. नंतर हेक्टरी ३० किलो बियाण्यासोबत ही जिवाणू संवर्धक मिसळलेली माती चांगली एकत्रित करावी व थोडा वेळ सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी. 

पेरणी – लसुन घासाची पेरणी ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या कालावधीत करावी. पेरणीसाठी हेक्टरी ३० किलो बियाणे पुरेसे होते. पेरणी दोन ओळीत ३० से.मी. अंतरावर करावी. त्यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते. परंतु बहुतेक शेतकरी लसूण घासाची पेरणी बी फोकून करतात. त्यामुळे बियाणे जास्त लागते, उगवण एकसारखी होत नाही व पुढे आंतरमशागतीस त्रास होतो. 

सुधारित बियाणे – जमीन व हवामानानुसार वार्षिक अथवा बहुवार्षिक सुधारित वानांची निवड करावी. आनंद – २, आनंद – ३ व आनंद – ८ इत्यादि वानांचा वापर करावा. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील चारा पिके संशोधन प्रकल्पाने आर. एल. – ८८ या वानाची शिफारस राज्य व राष्ट्रीय स्तरावर केली आहे तसेच हे वान बहुवर्षीय उत्पन्न देणारे आहे. 

खत व्यवस्थापन – लसूण घास बहुवर्षीय वान घेतल्यास प्रती हेक्टरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. प्रती हेक्टरी २० किलो नत्र (४३ किलो युरिया), ८० किलो स्फुरद (५०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ४० किलो पालाश (६६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. बहुवर्षीय लसूण घासापासून भरपूर चारा उत्पादनासाठी, चार कापण्यानंतर खुरपणी करून हेक्टरी १५ किलो नत्र (३३ किलो युरिया) व ५० किलो स्फुरद (३१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) किंवा १०० किलो डी. ए. पी. द्यावे. 

आंतरमशागत – हात कोळप्याने कोळपणी करून घ्यावी व प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करावी नंतर पाणी द्यावे. त्यामुळे माती भूसभुशीत राहून जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते. कोळपणीमुळे पिकाच्या मुळाजवळील खोडाच्या भागात मातीची भर लागते व पीक वाढीस जोम येतो. 

पाणी व्यवस्थापन – जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन हिवाळ्यात १५ ते २0 दिवसांनी आणि उन्हाळ्यात १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे. जमिनीच्या मगदूरचा व हंगामाचा विचार करून वेळेवर पुरेसे पाणी व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. जास्त प्रमाणात पाणी दिल्यास घासाची रोपे मरण्याची शक्यता असते व त्यामुळे घास विरळ होण्याची संभावना असते. 

कापणी – पेरणीनंतर पहिली कापणी ५० ते ५५ दिवसाणी करावी. कापणी जमिनीपासून ५ ते ६ से.मी. उंचीवर करावी. कापणी करताना पीक उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी. पुढील कापण्या २१ ते २५ दिवसाच्या अंतराने कराव्यात. पहिल्या वर्षी १० ते ११ कापण्या तर दुसर्‍या वर्षी १२ ते १४ कापण्या होतात. तिसर्‍या वर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत हिरव्या चार्‍याकरिता कापण्या घ्याव्यात व शेवटच्या कापणीनंतर पिकाला ५ ते ६ दिवस पाण्याचा तान द्यावा. दरम्यान खुरपणी करून पाणी देण्यापूर्वी हेक्टरी १०० किलो स्फुरदची (६२५ किलो सिंगल सुपर फॉसफेट) मात्रा द्यावी व पाणी देऊन पीक बियान्यासाठी सोडावे. घासाचे पीक ५०% फुलोर्‍यात आल्यानंतर २% डाय अमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी. त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा २% डाय अमोनियम फॉस्फेटची दुसरी फवारणी करावी. यामुळे घासाच्या बियाणे उत्पादनात २०% वाढ होते. 

उत्पादन – लसूण घास या चारा पिकापासून १२० ते १४० टन हिरव्या चार्‍याचे उत्पादन वर्षभरात मिळते. 

पोषणमूल्ये - पौष्टिकतेचा विचार करता लसूण घासामध्ये प्रथिने – २० ते २४%, स्ंनिग्ध पदार्थ – २.३%, खनिजे – १०.९९%, काष्टमय तंतु – ३०.१३% व पिष्टमय पदार्थ कर्बोदके – ३६.६२ % असतात (शुश्कांशावर आधारित).

 

डॉ.श्रीकांत मोहन खुपसे सहाय्यक प्राध्यापक, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छ.संभाजीनगरव डॉ.तुषार राजेंद्र भोसलेसहाय्यक प्राध्यापकव डॉ. एन एम मस्केप्राचार्य, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छ.संभाजीनगर

टॅग्स :दुग्धव्यवसायचारा घोटाळाशेळीपालन