भारतीय हवामान विभागाने देशात उष्णतेची लाट येत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागांत तापमान वाढत आहे. वाढत्या उष्णतेच्या काळात शेतकऱ्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
दुपारचे तापमान त्याचबरोबर दिवस मावळेपर्यंत लागणारे उन वाढले आहे. त्यामुळे दुपारी बाहेर जाणे टाळावे, उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध व लहान मुले, गरोदर महिला, स्थूल लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, मधुमेही, हृदयविकार, दारूचे व्यसन असणारे, घट्ट कपडे घातलेले, घरदार नसलेले, कारखान्यात बॉयलरजवळ काम करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी संबंधित नागरिकांना उष्माघात होतो.
शेतकऱ्यांनी शेतातील कामे करणे टाळावे. मान्य आहे तुम्हाला त्यावेळी त्रास होत नसेल पण काही कालावधीनंतर त्रास जाणवायला सुरुवात होते त्यामुळे सावधान राहणेच योग्य आहे. सातत्याने पाणी पिणे हा चांगला उपाय ठरू शकतो.
त्यामुळे या अतिजोखमीच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाचा असतो. थकवा येणे, ताप येणे, शरीरावर रॅश उमटणे, हातापायांना गोळे येणे, चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता ही लक्षणे अतिउष्ण वातावरणात जाणवतात. अशी लक्षणे आढळल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ अंश जास्त तापमान असेल तर त्यास उष्णतेची लाट म्हणतात. दोन दिवस तापमान ४५ अंशपेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे असे म्हटले जाते.
एप्रिल, मे व जून महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव अधिक असतो. तसेच मृत्यू होण्याची शक्यता असते. अशावेळी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. पुरेसे पाणी प्यावे, प्रवासात पाणी सोबत ठेवावे, हलक्या वजनाचे सैलसर कपडे वापरावेत, गॉगल, छत्री, टोपी व चपला यांचा वापर करावा, पंखा, कूलरच्या मदतीने घर, कार्यालय थंड ठेवावे, उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रिन लावावे, सरबत, जलसंजीवनीचा वापर करावा.