Join us

Forest Area In Maharashtra : सन २०२३ चा राष्ट्रीय वन अहवाल; देशात २१ तर महाराष्ट्रात केवळ १६ टक्के वनक्षेत्र शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:16 IST

Forest Area In Maharashtra : गेल्या दहा वर्षांत देशातील वनक्षेत्राची पाहिजे तशी वाढ झालेली नाही. राष्ट्रीय वन अहवाल २०२३ नुसार भारतात २१ टक्के आणि महाराष्ट्रात १६ टक्के एवढेच वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. त्यामुळे हवामानात कमालीचा बदल झाला आहे.

गणेश वासनिक

गेल्या दहा वर्षांत देशातील वनक्षेत्राची पाहिजे तशी वाढ झालेली नाही. राष्ट्रीय वन अहवाल २०२३ नुसार भारतात २१ टक्के आणि महाराष्ट्रात १६ टक्के एवढेच वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. त्यामुळे हवामानात कमालीचा बदल झाला आहे.

देहरादून येथील 'फॉरेस्ट सव्ह ऑफ इंडिया या संस्थेने नुकताच २०२३ चा राष्ट्रीय वन अहवाल (आयएसएफआर) दिल्ली येथील वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे सादर केला आहे. हा अहवाल देशातील वनसंपत्ती आणि संसाधनावरील प्राथमिक माहितीच्या आधारावरचा मूल्यांकन अहवाल मानला जातो.

या अनुषंगाने देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील जंगलाचा आधुनिक पद्धतीने अभ्यास करण्यात आला. वनक्षेत्र आणि बाहेर वृच्छादन, कार्बनसाठा, वनाला लागलेल्या आगीच्या घटना अहवालात नमूद आहेत.

आयएसएफआरचा निष्कर्ष

भारतात ८२७३५६.९५ चौरस कि.मी. वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र आहे. हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या २५.१७ टक्के एवढे आहे. वनक्षेत्राचे क्षेत्रफळ २१.७६ टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे आणि वृक्षाच्छादन क्षेत्रफळ ११२०१४.३४ चौरस कि.मी. म्हणजे ३.४१ टक्के आहे.

दहा वर्षांत घनदाट जंगल वाढले

• राष्ट्रीय वन अहवाल २०२३ मध्ये सन २०१३ पासून दहा वर्षांमध्ये घनदाट क्षेत्रामध्ये ३४६५.१२ चौरस कि. मी. वाढ झालेली आहे, तर मध्यम घनता वनक्षेत्र १०४३.२३ चौरस कि. मी. ने कमी झालेले आहे, हे मात्र चिंतेचा विषय आहे.

• मध्य प्रदेश, कर्नाटक, लडाख, नागालँड या राज्यात सर्वाधिक घट झाली आहे, तर राखीव वनांच्या बाहेर गुजरात, बिहार, केरळ, उत्तर प्रदेश, आसाम या राज्यात वाढ झालेली आहे. राखीव वनक्षेत्राबाहेरील भागात मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात घट झालेली आहे.

कार्बनसाठ्यामध्ये वाढ

२०१३ च्या तुलनेत २०२३ मध्ये ७२८५.०५ मेट्रिक टन म्हणजे ८१.५ टक्के मेट्रिक टन कार्बन साठा वाढला. दरवर्षी ही वाढ ४०.७५ मेट्रिक टन आहे. अरुणाचलमध्ये सर्वाधिक १०२१ मेट्रिक टन आणि मध्य प्रदेशात ६०८ मेट्रिक टन, छत्तीसगढ ५०५, महाराष्ट्र ४६५, जम्मू काश्मीर १७४.१०, सिक्कीम १६९.२०, हिमाचल प्रदेश १६३.६८, अंदमान-निकोबार १६२.६२ मेट्रिक टन कार्बन साठा वाढला. २००५ च्या तुलनेत हवेची शुद्धता २.२९ अब्ज टन अतिरिक्त कार्बनवर पोहोचली आहे.

दोन वर्षात वृक्ष लागवड कमी

• राज्याचे वनक्षेत्र वाढविण्याकरिता २०१६ पासून ५० कोटी वृक्ष लागवड योजना मोठा गाजावाजा करून प्रारंभ झाली. मात्र, गेल्या दोन वर्षांत वृक्ष लागवड कमी झाली. अशातच बेसुमार वृक्षतोडीमुळे महाराष्ट्रातील वनक्षेत्र १६.५५ टक्के एवढेच राहिले आहे.

• महाराष्ट्रात ५०८५३.५३ चौरस कि.मी. इतके वनाच्छादित क्षेत्र आहे, तर झुडपी जंगल ३६४५.६७ चौरस कि. मी. इतके आहे. झुडपी जंगलाची टक्केवारी १.१८ इतकी आहे.

• महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असली तरी वनक्षेत्राची संख्या स्थिरच आहे. ३३ टक्के वनक्षेत्र वाढविण्यासाठी दोन दशकांची वेळ उजाडेल.

हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात

टॅग्स :जंगलवनविभागशेती क्षेत्रग्रीन प्लॅनेट