उत्तर महाराष्ट्रात मार्च महिन्याला सुरूवात होताच जंगलालाआग लागण्यास सुरूवात होते. आगीच्या घटना कमी करण्याबरोबरच आग लागल्यास ती तत्काळ विझवून नुकसान कमी करण्यासाठी वन विभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, याबाबत वन विभागाने नियोजन केले आहे.
गडचिरोली वनवृत्त हे आदिवासीबहुल क्षेत्र असून, येथील नागरिकांचा उदरनिर्वाह वनोपजावर अवलंबून आहे. वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोह वृक्ष आहेत. मोहफुल व्यवस्थित वेचता यावे, यासाठी मोहाच्या झाडाखाली जमलेला पालापाचोळा जाळला जातो. त्यासोबतच तेंदू संकलन व शेतातील राब जाळणे यासाठीही स्थानिक ग्रामस्थांकडून आग लावली जाते.
काही वेळेस शिकारीसाठी, अतिक्रमणासाठी, गवतासाठी आग लावली जाते. नैसर्गिकरीत्या आग लागल्याचे क्वचितच पाहायला मिळते. तेंदूपत्ता चांगला यावा, यासाठीही आग लावली जाते.
संबंधित:गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्तामुळे अनेकांना रोजगार, यंदा दुप्पट बोनस मिळणार
ही आग प्रामुख्याने एप्रिल महिन्यात लावली जाते. या कालावधीत जंगलातील गवत वाळलेले असते. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरते. आगीच्या घटना थांबण्यासाठी वन विभाग आता अलर्ट झाला आहे.
आगीमुळे शेकडो पक्ष्यांचा निवारा नष्ट होतो. लहान पिल्लू, अंडी जळून खाक होतात. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांना जीव गमवावा लागतो. लहान वृक्ष नष्ट होतात. वणवा लागू न देणे ही प्रत्येक व्यक्तीची सामाजिक जबाबदारी आहे. ग्रामसभांनी प्रत्येक ग्रामस्थाला याबाबत जागरुक करावे. वन विभागही नागरिकांमध्ये जागृती करत आहे.- गणेश पाटोळे, विभागीय वन अधिकारी
कोणते उपाय योजणार?
- मोह वेचणारे ग्रामस्थ ठराविक असतात आणि ते ठराविक भागात मोह वेचण्यासाठी दरवर्षी जातात. मोह वेचणाऱ्या ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांना जंगलाला आग न लावण्याबाबत आवाहन केले जात आहे. त्यांच्या मदतीने मोह वेचण्याचे क्षेत्र निश्चित करून त्यांच्याकडून तसेच वन विभागच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोह झाडाखाली साचलेला पालापाचोळा फायर ब्लोअरच्या मदतीने साफ करून दिला जाणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जागृती केली जात आहे.
- विभागीय वन अधिकारी दक्षता यांना वनवणवा व्यवस्थापनासाठी कत्ता नियंत्रक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. फायर अलर्टचे संदेश प्राप्त होताच पाचही वन विभागाचे उपवनसंरक्षक, त्या विभागाचे नोडल ऑफिसर व संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी व गरज पडल्यास वनपाल, वनरक्षक यांना पाठवले जाते. रस्त्याच्या बाजूला असलेले गवत जाळले जात आहे. त्याला फायर लाइन जाळणे असे म्हटले जाते.