Join us

Forest Department : आयएफएसना दिलासा: नागपुरात 'के. के'ची विकेट पडणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:13 IST

Forest Department : राज्यातील वन विभागाच्या सचिवपदी मिलिंद म्हैसकर या मराठमोळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने मराठी आयएफएस अधिकाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

गणेश वासनिक

अमरावती : राज्यातील वन विभागाच्या (Forest Department) सचिवपदी मिलिंद म्हैसकर(Milind Mhaiskar) या मराठमोळ्या अधिकाऱ्याची गुरुवारी नियुक्ती झाल्याने मराठी आयएफएस अधिकाऱ्यांना चांगल्याच दिलासा मिळालेला असून, उत्तरेकडून होणारी गळचेपी आता थांबणार आहे. मात्र, वनभवनाची सूत्रे हलविणाऱ्या एका आयएफएसची उचलबांगडी होणार हे निश्चित मानले जात आहे.

राज्य शासनाने गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती केल्या होत्या. यात वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांना बढती देत वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पदस्थापना दिली होती.

या प्रकारामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला होता, कारण रेड्डी यांनी दक्षिण आणि उत्तर अशी मोठ बांधून मराठी आयएफएस अधिकाऱ्यांना 'साइड ट्रॅक' केले होते.

गेल्या ४ वर्षांपासून सचिवांनी मनमानी पद्धतीने वन विभागाचा कारभार हाकला. यामध्ये वन भवनातील 'के. के', या दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्याने, तर आयएफएस अधिकाऱ्यांना वेठीस धरले होते, कारण त्यांना वन मंत्रालयाचे पाठबळ होते, हे सर्वश्रूत होते.

'टॉप अप' मॉडेलमुळे जंगल वाढले नाही

• वेणु गोपाल रेड्डी हे मूळ आंध्र प्रदेशातील आहे. त्यांनी आंध्र प्रदेशातीत 'टॉप अप' मॉडेल लागू करून महाराष्ट्राच्या वन विभागात चालणाऱ्या योजनेंतर्गत रोपवनाची कामे बंद पाडली. त्यामुळे वन विभागाच्या निर्मितीनंतर या दोन वर्षात रोपवनाची कामे पूर्णपणे ठप्प झालेली आहे.

• वास्तविक पाहता मग्रारोहयो असताना, अभिसरण ही योजना वन विभागावर लादण्यासाठी 'के. के' नामक या अपार प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी महत्त्वाची भूमिका निभावत रोपवनाचे खोबरे केले, कारण वन सचिवांचा पाठिंबा असल्यामुळे 'के. के.' सुसाट होते. आता मात्र नवीन सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडून वनाधिकाऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहे.

'के. के.' नागपुरात ठाण मांडून

वन विभागात सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले के. के. हे गेल्या ४ वर्षांपासून नागपुरात ठाण मांडून बसलेले आहेत. वनसंरक्षक ते अप्पर मुख्य वन संरक्षक हा प्रवास सुरू आहे. मराठी आयएफएस अधिकाऱ्यांना दुय्यम स्थान देणारे के. के. यांना वनभवन सोडण्याची वेळ आली आहे. कारण त्यांचा मोठा आका वनमंत्रालयाच्या बाहेर गेला आहे.

'के, के' यांची किर्ती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे कानावर पोहोचली असून, त्यांच्याकडून अर्थ आणि नियोजन विभाग काढले जाईल, अशी विश्वसनीय माहिती आहे.

वन अधिकाऱ्यांचा आनंदोत्सव

• वन विभागाला गेल्या कित्येक वर्षांनंतर मराठी आणि चांगले सचिव लाभले आहे. गुरुवार २ जानेवारी रोजी जेव्हा वेणु गोपाल रेड्डी यांची बदली झाली, तेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांचे अभिनंदन करीत आनंदोत्सव साजरा केला. अनेक वर्षे वनविभागाचे सचिव असताना रेड्डी यांनी महाराष्ट्रातील वनांचा दौरा केलेला नाही. 'टॉप अप' सारखी फेल योजना वनविभागात आणून जंगलाची वाढ कमी केली. मात्र, आता नव्या सचिवांकडे आयएफएस व राज्य सेवेतील अधिकारी आपली कैफियत मांडणार आहेत.

हे ही वाचा सविस्तर : IAS Transfer : राज्यात १० आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या; कृषी खात्याला मिळाले नवे सचिव

टॅग्स :शेती क्षेत्रजंगलवनविभागसरकारराज्य सरकार