हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतंर्गत आंबिया बहारसाठी केळीचापीक विमा काढणाऱ्या ७७ हजार ८३२ अर्जदार शेतकऱ्यांपैकी १० हजार ६१९ शेतकऱ्यांचे बोगस अर्ज असल्याचे उघडकीस आले आहे. पीक विमा कंपनीने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. यामध्ये रावेर, चोपडा व यावल या तालुक्यांमधील अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
२०२२ मध्ये आंबिया बहारसाठी केळीपीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे पीक विमा कंपनीकडून प्रत्यक्ष बांधावर जाऊन केळी लागवड झाली आहे की नाही? याबाबतची पडताळणी केली होती. त्यामध्ये १० हजार ६१९ शेतकऱ्यांनी केळी लागवड न करताच विम्यासाठी अर्ज केला होता, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून ते सर्व अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील १० हजार बोगस अर्जदार शेतकरी बाद झाले आहेत. या १० हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी भरलेला १० कोटी ७५ लाख रुपयांचा स्वहिस्सा विमा कंपनीकडून जप्त करण्यात येणार आहे.
लागवड क्षेत्रापैकी जास्तीचा काढला विमा११.३६० शेतकयांनी लागवड केलेल्या जमिनीपेक्षा जास्त क्षेत्रावर विम्यासाठी अर्ज केले असल्याचेही उघड झाले आहे. तर १.९०२ शेतकयांनी दाखल केलेले सर्व्हे क्रमांक जुळत नाहीत. यामुळे या शेतकयांना विमा मिळण्याची शक्यता कमी आहे. आता कंपनीकडून नव्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या क्षेत्राची पडताळणी करण्यात येणार आहे.