अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी अर्जाच्या पडताळणीमध्ये २१५ विमा प्रस्तावांमधील १३८ हेक्टर क्षेत्र अयोग्य आढळले आहे.
कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून पडताळणी केली होती. मृग बहारानंतर आता आंबिया बहार फळपीक योजनेमध्येही बोगस अर्ज आढळून आले आहेत.
फळबागांच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीचा मार्ग जात असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा फळबागा लागवडीकडे कल वाढला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांकडून घेतला जातो. त्याचबरोबर फळबागा विमा संरक्षित करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
आंबिया बहार फळपीक विमा योजनेमध्ये यावर्षी तालुक्यातून डाळिंब, द्राक्ष, आंबा आणि केळी फळबागांसाठी ७७४ शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केले होते. यामधून ४८३ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते.
या अर्जाची पडताळणी केली असता ५५९ अर्जामधील ३४५ हेक्टर योग्य असल्याचे, तर २१५ अर्जामधील १३८ हेक्टर क्षेत्र अयोग्य आढळून आले आहे. यातील ७५ अर्जामधील ३९ हेक्टर क्षेत्रावर फळबाग आढळून आली नाही.
तसेच १०९ शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष फळबागांपेक्षा ८० हेक्टर क्षेत्र जास्त आढळून आले आहे, तर ३१ शेतकऱ्यांनी कमी वय असलेल्या फळबागांचे १९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केल्याचे उघड झाले आहे.
मृग बहार पडताळणीमध्येही १३६ शेतकऱ्यांनी लागवडीपेक्षा जास्त क्षेत्र विमा संरक्षित केले होते, तर १५२ शेतकऱ्यांकडे फळबाग आढळून आली नव्हती. १०६ हेक्टर क्षेत्रावर विमा योजनेसाठी बोगस अर्ज उघड झाले होते. आता आंबिया बहारामध्ये बोगस विमा अर्ज आढळून आले आहेत.
आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी अर्जाची पडताळणी करून अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आला आहे. - शशिकांत गांगर्डे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा.
हेही वाचा : नियमित खा फक्त एक चिकू; आरोग्यवर्धक चिकू दूर करेल विविध विकार