दिव्यांगांना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी तसेच दिव्यांगांना त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करून त्यांना जीवन अगण्यास सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र दिव्यांग व वित्त विकास महामंडळामार्फत शंभर टक्के अनुदान देऊन मोफत ई-रिक्षासाठी योजना राबविल्या जात आहेत. सद्यस्थितीत अर्ज प्रक्रियेची मुदत संपुष्ठात आली आहे. मात्र सर्व्हर डाऊनमुळे अनेक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता आलेला नाही, त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची योजनेची मुदत काय?
मोफत रिक्षा मिळवण्यासाठी 3 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होऊन या अर्जासाठी 8 जानेवारी ही अंतिम मुदत होती. मात्र, सध्या ऑनलाइन अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने मागणी केली जात आहे. तसेच पुढील अर्ज प्रक्रिया ही ०१ एप्रिल पासून सुरु होणार असल्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे.
दिव्यांगांसाठी मोफत ई- रिक्षासाठी पुण्यातून अर्ज जास्त येतात. मात्र, सर्व्हर डाउन आल्याने ऑनलाइन अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे लाभार्थीना फॉर्म भरणे वेळेत होत नसल्याने पुन्हा मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दिव्यागांसाठी असणाच्या योजनेचा फायदा हा खऱ्या अर्थाने वंचित दिव्यांगांना मिळत नसल्याची खंत दिव्यांग संघटनेच्या अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी व्यक्त केली.
कोणाला मिळते मोफत ई-रिक्षा
मोफत ई-रिक्षासाठी लाभ मिळण्यासाठी लाभार्थी हा 40 टक्के दिव्यांग असावा, तसेच त्याचे वय 18 ते 55 वयोगटातील असावा आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाते. अशा दिव्यांगांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत 100 टक्के अनुदानावर अपंगांना ई-रिक्षा दिली जात आहे. यासाठी दिव्यांगांनी आपल्या जिल्ह्यातून अर्ज करणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, बँक पासबुक, रेशन कार्ड, यूडीआयडी कार्ड आदी कागदपत्रे तसेच जातीचा दाखलासुद्धा लागतो. यारियाद ओळखीसाठी पुरावासुद्धा जोडावा लागतो. याद्वारे विविध खाद्यपदार्थ, किराणा, स्टेशनरी, पूजा साहित्य, किरकोळ वस्तू भांडार, रद्दी भंगार वस्तू, फळाचे दुकान, भाजीपाला, प्रसाधने, मोबाइल दुरुस्ती, झेरॉक्स सेंटर, विविध स्वतंत्र व्यवसाय, वाहतूक व्यवसाय व इतर व्यवसाय करता येतात.