Free Electricity For Farmer :
नागपूर : शेतकऱ्यांना शेतीसाठीवीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वीज कंपनी तयार करण्यात आली असून, त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियोजनामुळे पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
सौरऊर्जेच्या वापराचे नियोजन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे धोरण इतर राज्यांनी राबवावे, अशा सूचना केल्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यासोबतच सौर कृषी महामंडळांतर्गत अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढवून भविष्यात विजेचे दर स्वस्त होतील, असे संकेतही त्यांनी दिले. 'महावितरण'तर्फे वनामती सभागृहात बुधवारी(१० ऑक्टोबर) रोजी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यादरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील वितरण बळकटीकरण व्यवस्थेच्या आणि विस्तारासाठी १७३४ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यासोबतच नागपूर जिल्ह्याची वीज वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी ३१३ कोटी रुपयांची योजना सुरू करण्यात आली.
यावेळी आ. ॲड. आशिष जयस्वाल व डॉ. परिणय फुके, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, राज्याची ४० हजार मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांत केलेल्या नियोजनामुळे येत्या पाच वर्षांत ती वाढून ४५ हजार मेगावॅट होणार आहे. कोळशामुळे होणारी पर्यावरणाची हानी आणि त्याचे वाढते प्रमाण यावर चिंता व्यक्त केली.अपारंपरिक ऊर्जा उत्पादन २०३० पर्यंत १६ टक्क्यांवरून ५४ टक्क्यांपर्यंत वाढवले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संचालक (संचलन) अरविंद भादीकर, प्रादेशिक संचालक परेश भागवत, कार्यकारी संचालक सुनील पावडे, मुख्य अभियंता दिलीप दोडके, सुहास रंगारी, पुष्पा चव्हाण, हरीश गजबे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्याला ३१३ कोटी
• नागपुरात अखंडित वीजपुरवठा आवश्यक आहे. त्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यासाठी ३१३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेची सुरुवात केली जात आहे. शहरातील विजेचे जाळे भूमिगत करण्यात येणार असून, त्यामुळे सौंदर्याकरणातही वाढ होईल.
शेतकऱ्यांचा गौरव
• पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत राज्यातील दुसरे सौरग्राम पुणे जिल्ह्यातील टेकवडीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच विठ्ठल शत्रुघ्न शिंदे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला.
नागपूर जिल्ह्यातील बळीराजा
मोफत वीज योजना व पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे व कार्यकारी संचालक धनंजय औढेकर यांचाही सन्मान करण्यात आला.