सटवाजी वानोळे
पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सरकारने विविध योजना राबविल्या आहेत.
त्यात वर्ष २०१८ मध्ये ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामूल्य देण्यासाठी कन्या वन समृद्धी योजना सुरू केली. परंतु, गेल्या तीन वर्षांत ग्रामपंचायतीच्या मध्यामातून एकाही शेतकऱ्याने अर्ज केलेला नाही. शेतकऱ्यांनी कन्या वन समृद्धीकडे अक्षरशः पाठ फिरवलेली दिसत आहे.
दिवसेंदिवस पर्यावरणात बदल होत आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लावगड केली जात आहे. तसेच, वन विभागाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र या विविध योजनेची अनेक नागरिकांना माहितीच नसते.
त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने यावर उपाययोजना करून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
कोण घेऊ शकतो लाभ ?
• ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त २ मुली जन्माला येतील व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाईल. तसेच, १ मुलगा किंवा १ मुलगी अथवा दोन्ही मुली ज्या कुटुंबात दोन्ही मुली ज्या कुटुंबात असतील, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
• या योजनेसाठी ग्रामपंचायतमध्ये मुलीच्या नावाची नोंद करून ग्रामपंचायतकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
१० रोपे
सामाजिक वनीकरणच्या रोपवटिकामधून ग्रामपंचायत मार्फत ५ सागवान रोपे, २ आंब्यांचे रोपे, १ फणस, १ जांभूळ, अणि १ चिंच अशी रोपे दिली जातात. भौगोलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या रोपांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
महिला सबलीकरणावर सर्वांचेच लागलेय लक्ष
• या योजनेच्या माध्यमातून मुलगा आणि मुलगी समान असून, महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.
• तसेच, मुर्लीच्या घटत्या संख्येवर अशा योजनेच्या माध्यमातून काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे आहे. आज घडीला महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहत असल्याने त्यांच्यासाठी देखील ही योजना आता दिलासा दायक ठरत चालली आहेत.
लागवडीनंतर फोटो पाठवणे बंधनकारक...
• एकंदरित दहा झाडांची लागवड पूर्ण झाल्यानंतर लागवड केलेल्या ठिकाणाचा तपशील, रोपाचे फोटो तसेच संबंधित शेतकऱ्यांमार्फत ग्रामपंचायतीला सादर करणे बंधनकारक आहे.
• तसेच ही माहिती ग्रामपंचायतीमार्फत एकत्रित करुन तालुकास्तरावरील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनिकरण यांना दरवर्षाला ३१ जुलै रोजीपर्यंत पाठविण्याचे नियमात सांगितल्या गेले असल्याची माहिती आहे.
मुलीच्या भविष्यासाठी वापरण्यास मुभा
• लावगड केलेल्या झाडांची निगा, संरक्षण, संगोपन, आणि झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण उच्च राहावे, याकरिता शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला सामजिक वनीकरणाकडून दिला जाईल.
• तसेच, लावगड केलेल्या झाडांपासून मिळणोर सर्व उत्पन्न मुलीचा कौशल विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळवणे व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या ऐच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा राहील.
गत तीन वर्षांत एकाही ग्राम पंचायतीने सामाजिक वनीकरण विभागाकडे रोपासाठी अर्ज केलेला नाही. - सुहास बडेकर, विभागीय फॉरेस्ट ऑफिसर, सामाजिक वनीकरण विभाग वर्धा.