Join us

नैसर्गिक शेतीतून भाजीपाला उत्पादनात गाव बनले 'हब'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 9:13 AM

हल्ली बाजारात मिळणार्‍या रसायनिक प्रक्रियेतून तयार झालेल्या भाजीपाल्यास रामराम करत या गावाने तयार केला आपल्या कुटुंबासाठी घरचाच सेंद्रिय भाजीपाला.

मारोती चिलपिपरे

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाबुळगाव येथील नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून भाजीपाल्याचे उत्पादन घेत नाबार्ड व संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचा जीवा प्रकल्प जवळपास २५ शेतकऱ्यांनी साकारला आहे. नैसर्गिक शेती करत भाजीपाला व इतर पिकांमध्ये  आता हे गाव "हब" बनत आहे.

नैसर्गिक शेतीचे महत्त्व विषद करत नैसर्गिक संसाधने वापरून जमिनीचा पोत सुधारणे आणि विषमुक्त अन्नधान्यासह शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात बचत करणे, देशी गायीचे शेण व गोमूत्र वापरून विषमुक्त शेतीला चालना देणे, पीक लागवडीचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे या उद्देशाने ह्या प्रकल्पातून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

घरीच मिळतो भाजीपाला

दोन महिन्यांच्या परिश्रमातून आता हे संपूर्ण कुटुंब रोजच्या आहारात भाजीपाला वापरत आहे. महागाईच्या काळात त्यांना दररोज ताजा विषमुक्त भाजीपाला मिळत आहे. जवळपास एक महिन्यापासून त्यांनी बाजारातून भाजीपाला विकत आणला नाही. भाजीपाल्यावरील खर्च कमी झाले.

या शेती पद्धतीला शून्य रुपये खर्च कसा येतो?

१. गावातील सुरेखा अंबादास गायकवाड ह्या घरासमोर वांगी, टोमॅटो आदी • काही रोपे लावून भाजीपाला पिकविण्याची धडपड करीत असल्याचे नाबार्ड संस्थेच्या लक्षात आले. मुळात अशाच महिला परसबाग करू शकतात ही बाब संस्था कार्यकर्त्यांना लक्षात आली.

२. त्यांना घरासमोर सगळ्या प्रकारचा भाजीपाला नैसर्गिक पद्धतीने लागवड करण्याचा सल्ला दिला. त्यांनी होकार दर्शविला पण पाणी नसल्याची खंत त्यांनी बोलू दाखविली. संस्था कार्यकर्त्यांनी सांडपाणी व नळाच्या वाया जाणाऱ्या पाण्यावर भाजीपाला पिकविता येईल, असा विश्वास दिला. यासाठी पाण्याचे नियोजन कसे करायचे याची माहिती दिली.

३. जीवा प्रकल्पाच्या माध्यमातून मिरची, वांगे, टोमॅटो, मुळा, पालक, मेथी, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकाचे बियाणे उपलब्ध करून दिले. त्यांनी नंतर सर्व भाजीपाला चांगल्या प्रकारे लागवड करून त्याला घरातील सांडपाणी आणि नळाचे पाणी वापरून परसबाग फुलवली आहे.

टॅग्स :शेती