नीरा उजवा कालव्यामधून पाणी सोडून तिसंगी (पंढरपूर) तलावासह सांगोला तालुक्यातील महिम, चिंचोली व हलदहिवडी तलाव पाण्याने पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत तसेच सांगोला शाखा फाटा क्रमांक ५ला पाणी सोडून लाभ क्षेत्रातील आवर्तन पूर्ण करण्याची मागणी आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत लावून धरली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन येत्या १० नोव्हेंबरपासून नीरा उजवा कालवा मैल १९३ खाली पूर्ण क्षमतेने कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागास दिले.
रब्बी हंगाम २०२३-२४च्या सिंचन नियोजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप कार्यकारी संचालक कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले कार्यकारी अभियंता डुबल, विधान परिषद सदस्य आमदार रामराजे निंबाळकर, आ. दत्तात्रय भरणे, आ. शहाजीबापू पाटील, आ. समाधान अवताडे, आ. राम सातपुते, आ. रवींद्र दंगेकर, माजी आमदार दीपक साळुंखे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.
आ. शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगोला तालुक्यात चालू वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे उद्भवलेली दुष्काळसदृश्य परिस्थिती व रब्बी हंगामाच्या दृष्टीने शेती व पिण्याच्या पाण्याची वस्तुनिष्ठ परिस्थिती मांडली. तसेच तिसंगी तलावात पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकरी धरणे आंदोलनास बसले आहेत. ही गंभीर बाब समितीच्या निदर्शनास आणून देत तिसंगी तलावात पाणी सोडून भरून देण्याची मागणी केली.