Pune : महाराष्ट्रातील गाळप हंगाम सुरू होऊन एक आठवडा उलटला आहे. साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांना गाळपाचे परवाने देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या एका आठवड्यात राज्यातील गाळप हंगाम संपूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. दरम्यान, आयुक्तालयाच्या माहितीनुसार मागील म्हणजेच २०२३-२४ गाळप हंगामातील एफआरपीची रक्कम अद्यापही कारखान्यांकडे बाकी आहे.
दरम्यान, मागील गाळप हंगाम हा १५ मे २०२४ रोजी समाप्त झाला. त्यामुळे मे महिन्यातच सर्व शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळणे अपेक्षित होते. कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम बाकी असल्यामुळे आयुक्तालयाने ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली होती. १५ नोव्हेंबर अखेर यातील ९ साखर कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
राज्यातील केवळ २ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर कोजनरेशन इंड. लि., रूद्देवाडी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर या कारखान्याकडे १ कोटी ४१ लाख रूपये तर श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना, आदिनाथनगर, ता. करमाळा या साखर कारखान्याकडे ६३ लाख रूपये बाकी आहेत.
राज्यातील एकूण एफआरपीचा विचार केला तर ९९.९९ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून केवळ २ कोटी ४ लाख रूपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. आत्तापर्यंत साखर कारखान्यांनी ३६ हजार ७५६ कोटी रूपयांची एफआरपी (तोडणी आणि वाहतूक खर्चासहीत) शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.