fruit Crop Damage :
अमरावती : यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण यामुळे ३६ हजार ८४१ हेक्टरमधील संत्राची फळगळ झाली. याशिवाय ५४४ हेक्टरमधील लिंबूचेही नुकसान झाले आहे.
पंचनाम्याअंती ३६ हजार रुपये हेक्टर या निकषाने १३४.६२ कोटींची मागणी विभागीय आयुक्तांमार्फत शुक्रवारी (११ ऑक्टोबर) रोजी शासनाकडे सादर करण्यात आलेली आहे.
विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संत्रा उत्पादकांना तातडीने अनुदान मंजूर करण्याची उत्पादकांची मागणी आहे.
प्रतिकूल परिस्थिती व कीड व रोगामुळे दहा तालुक्यांतील ४२ हजार संत्रा उत्पादकांना याचा फटका बसला आहे. संत्रा उत्पादकांनी आवाज उठविल्यानंतर शासन-प्रशासनाला जाग आली व फळगळीचे पंचनामे करण्याचे निर्देश महसूल व कृषीच्या यंत्रणांना देण्यात आले.
तालुकानिहाय बाधित क्षेत्र, अनुदानाची मागणी
अहवालानुसार मोर्शी तालुक्यात २३.०३ कोटी (६३९७ हेक्टर), चांदूर रेल्वे ३.७० कोटी (१०२८ हे.), भातकुली २.५९ लाख (७.२० हे), चिखलदरा २५.४९ लाख (७०.८१ हे.), तिवसा २०.४६ कोटी (२९०८ हे.), वरुड ७७.०५ कोटी (२१४०२ हे.), अमरावती ३.३१ कोटी (३३७५ हे.), धामणगाव रेल्वे ३.७० कोटी (१०२६ हे.), नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ९२.२६ कोटी (२५६ हे.) अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे.