Join us

Fruit Crop Insurance : शेतकऱ्यांनो, फळ पीकविमा योजना सुरू 'या' आहेत अंतिम तारखा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 12:52 PM

'फळ पीकविमा योजना' चे अर्ज भरणे सुरु झाले आहेत. अंतिम तारिखही जाहीर करण्यात आल्या आहेत. तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करावी. (Fruit Crop Insurance)

बीड : पुनर्रचित हवामान आधारित 'फळ पीकविमा योजना' आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी या ९ फळ पिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.ही योजना बीड जिल्ह्यात ही राबविली जाणार असून, शेतकऱ्यांनी वेळेवर आपला फळ पीकविमा भरून क्षेत्र संरक्षित करून घेणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीतजास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. 

केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यासाठी फळपिकांचे उत्पादनक्षम वय निश्चित केले आहे. आंबा, चिकू, काजू फळपिकासाठी उत्पादनक्षम वय ५ वर्षे, लिंबू फळपिकांसाठी उत्पादनक्षम वय ४ वर्षे, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ फळपिकासाठी उत्पादनक्षम वय ३ वर्षे, डाळिंब, द्राक्ष फळपिकासाठी उत्पादनक्षम वय २ वर्षे, केळी, पपई, स्ट्रॉबेरी पिकासाठी उत्पादनक्षम वय नाही. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

गारपीट या हवामान धोक्यासाठी संरक्षण आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व याकरिता अतिरिक्त विमा हप्ता देणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवायचा असेल, अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमित व अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फतच भरणे आवश्यक आहे.

विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

असा आहे विमा भरण्याचा कालावधी

•आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये फळपीक द्राक्ष विमा संरक्षित रक्कम ३ लाख ८० हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर आहे. मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख आहे. गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ३३ हजार आहे. केळी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ५७ हजार आहे. पपई पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ४० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम १३ हजार आहे.

• शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर आहे. संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख आहे.  गारपीट हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ३३ हजार आहे. डाळिंब पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ६० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा ५३ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२५ असा आहे. अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, वेगाचे वारे, गारपीट आदी निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत दिली जाणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रफळेपीक विमाशेतकरीशेती