उन्हाची दाहकता शमविण्यासाठी नागरिकांचा फळांच्या सेवनाकडे अधिक कल वाढला आहे. प्रत्येक ऋतूत वेगवेगळी फळेबाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात. उन्हाळ्यात शरीरातील कमी झालेल्या पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी रसाळ फळे फायदेशीर ठरतात. त्यात प्रामुख्याने टरबूज, खरबूजचा समावेश असतो. मात्र, यंदा या फळांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढल्याचे येथील फळ विक्रेते अल्लाबकस यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील मंठा आठवडी बाजारासह शहरातील बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी भागात फळे विक्रीची मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांत सफरचंद, डाळिंब, द्राक्ष, चिकू, संत्रे, टरबूज, खरबूज, मोसंबी, पपई, नारळपाणी, अननस आदी फळे विक्रीला ठेवण्यात आली आहेत.
ग्रामीण भागातील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी आपली फळे येथे विक्रीला आणत आहेत. काही फळे परराज्यातून देखील शहरात दाखल होतात. काही जण तर जागा मिळेल तिथे रस्त्याच्या बाजूला दुकान थाटून फळांची विक्री करीत असून, ग्राहकही खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी फळांचे सेवन करा
तापमानात वाढ होत असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच, उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी दररोज फळांच्या सेवनाबरोबरच आठ ते दहा लीटर शुद्ध पाणी प्यायला हवे. - डॉ. शरद शेळके, मंठा
फळांच्या राजाच्या आगमनाची प्रतीक्षा
उन्हाळ्यात प्रामुख्याने आंबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्याची विक्रीही इतर फळांच्या तुलनेत अधिक असते. ग्रामीण भागात गावरान आंब्यावर अधिक भर असतो, तर शहरी भागात हापूस, केशर, देवगडसह रसाच्या गोड आंब्याला अधिक मागणी असते. आता आंब्याचा हंगाम सुरू होत असून, नागरिकांना त्याची प्रतीक्षा लागली आहे.
हातगाड्यांवर फळांची विक्री जोमात
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह ठिकठिकाणी हातगाड्या घेऊन फळांची विक्री केली जात आहे. परिसरातील रस्त्यांवर जागोजागी हातगाडे लागलेले दिसत आहेत. त्याचबरोबर ज्यूसची दुकानेही मोठ्या प्रमाणात थाटली आहेत.