Join us

इंधन दरवाढीने ट्रॅक्टर नांगरणीचे दर वाढले; उत्पन्नात मात्र वाढ नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 10:09 AM

बैलाची संख्या घटल्याच्या ही होतोय परिणाम

दिवसेंदिवस जनावरांचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेती मशागतीसाठी बैलजोडी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरद्वारे शेतीकामे करून घ्यावी लागत आहे. अशातच इंधनाचे दर वाढल्यामुळे नांगरणीचेही दर वाढले आहेत. यंदा ट्रॅक्टरचालकाला एकरी दोन हजार रुपये देऊन नांगरणी करून घ्यावी लागत आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बैलाची संख्या घटल्याने शेतीकामे ही मशीनच्या साहाय्याने करावी लागत आहेत. त्यातच इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढत असून, ट्रॅक्टरने शेती करावी लागत आहे. आता पिकांची काढणी झाली असून, शेतकरी नांगरणी करण्यासाठी धावपळ करत आहेत. गतवर्षी १८०० रुपयांत एक एकर शेती नांगरली जायची. मात्र, यंदा नांगरणीसाठी २०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला एकरामागे २०० रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

एक लिटर पाणी खरेदी करण्यासाठी २० रुपये अन् दुधाला २५ रुपये भाव ; दूध उत्पादक संकटात

गरीब शेतकऱ्यांना दिवसेंदिवस शेती करणे कठीण होत आहे. उत्पन्नाऐवजी मशागत, पिकांचा खर्च पाहता तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान, डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. इंधन भाववाढ पाहता नांगरणीचेदेखील भाव वाढले आहेत, असे टॅक्टरचालक संतोष ससाणे यांनी सांगितले. शेती मशागतीचे भाव दिवसेंदिवस वाढत असून, शेती करणे कठीण होत आहे. शेती विकून कामधंदा करावा, अशी अवस्था झाल्याचे शेतकरी सुरेश मुळीक यांनी सांगितले.

कीड नियंत्रणासाठी दिवसा नांगरणी आवश्यक

सध्या शेतकरी नांगरणीच्या कामात व्यस्त आहेत. पूर्वी दिवसा बैलजोडीने नांगरणी होत असे. त्यामुळे पक्षी शेतातील कीड नियंत्रणात आणायचे. आता रात्री-अपरात्री ट्रॅक्टरच्या माध्यमातून नांगरणी केल्यामुळे कीड नियंत्रणात येत नाही. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी दिवसा नांगरणी करणे गरजेचे आहे.

नांगरणीच्या दरात झालेली वाढ

वर्षदर (एकरी)
२०२११४००
२०२२१६००
२०२३१८००
२०२४२०००
टॅग्स :शेतीशेतकरीपीक व्यवस्थापनइंधन दरवाढ