Join us

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी २० कोटींचा निधी उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 2:10 PM

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १०४ कोटींच्या निधीची मान्यता मिळाली आहे.

 फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवण्यात येत आहे. तर ही योजना २०२३-२४ या वर्षासाठी राबवण्यासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त निधीसाठी मान्यता देण्यात आली होती. यासाठी १०४ कोटींच्या निधीला मान्यता मिळाली असून फलोत्पादन संचालकांच्या मागणीनंतर वीस कोटींचा निधी कृषी विभागाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

दरम्यान, हा निधी सुरूवातीला प्रलंबित प्रकरणांच्या दायित्वासाठी वापरला जाणार असून त्यानंतर उरलेला निधी चालू वर्षासाठी वापरला जाईल. त्याचबरोबर या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन सदरचा अहवाल कृषी आयुक्तामार्फत शासनाकडे सोपवण्याचे आदेश फलोत्पादन संचालकांना देण्यात आले आहेत. 

काय आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना?राज्यातील फलोत्पादन क्षेत्र वाढण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून २०१८ च्या जुलैमध्ये माजी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये १५ फळपिकांचा सामावेश असून याअंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचन, खड्डे खोदणे, खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी अर्थसंकल्पात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी १०० कोटींच्या निधीची घोषणा केली होती.

२० कोटींचा निधी कृषी विभागाला वितरीतचालू वर्षासाठी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १०० कोटींच्या निधीची घोषणा केल्यानंतर आता २० कोटींचा निधी कृषी आयुक्तालयाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता या योजनेत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे. त्यानंतर नवीन शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.  

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी