यंदाच्या खरीप हंगामातील जून ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मदतनिधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ६ कोटी ४७ लाख ४१ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
दरम्यान, जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर काही पिके जळाली होती. अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली होती. या निधीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
अमरावती विभाग (बुलढाणा)
- बाधित क्षेत्र (हेक्टर) - ७५४९.५५
- बाधित शेतकरी संख्या - ७८९९
- निधी (रु. लक्ष) २२४५ २४५२ - ६ कोटी ४७ लाख ४१ हजार
अटी
निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी.
तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरिता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये २४ तासात ६५ मि.मी. पेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावामध्ये ३३ टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेले असल्यास ही मदत अनुज्ञेय राहील. मात्र, ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाही.