Join us

‘फाली’च्या माध्यमातून शाळकरी मुले शोधणार शेतीसमस्यांवर उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 4:04 PM

२२ ते २९ एप्रिल २०२४ या कालावधीत फाली- १० अधिवेशनाचे आयोजन जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि., जैन हिल्स, जळगाव येथे करण्यात आले आहे.

भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमाने पुढील दहा वर्षांसाठीच्या मोठ्या विस्तार योजनांच्या नियोजनासह नुकतेच दहावे वर्ष पूर्ण केले.

यामध्ये फालीचे १,२०० पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या ९० फाली कृषी शिक्षकांसह आणि फाली १० ला सहकार्य करणाऱ्या अकरा कंपन्यांमधील ५० हून अधिक उच्चस्तरीय आणि वरिष्ठ व्यवस्थापकांसह सहभागी होत आहेत.

फाली १० मध्ये सहभागी होणाऱ्या १७५ शाळांमधील हे फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश ह्या कृषी क्षेत्रातील तीन प्रमुख राज्यांमध्ये फाली सध्या कार्यरत आहे: तसेच, पुढील दहा वर्षांत किमान आणखी तीन मोठ्या राज्यांमध्ये विस्तार करण्याची फालीची योजना आहे.   

यावर्षी, ग्रामीण भागातील सरकारी अनुदानित शाळांमधील १५,००० पेक्षा जास्त फाली विद्यार्थ्यांनी कृषीशास्त्र, पशुधन शास्त्र, कृषी तंत्रज्ञान, ॲग्रो-एंटरप्राइज आणि ॲग्री-फायनान्स या विषयावरील परस्परसंवादी (इंटरअक्टीव) वर्गात भाग घेतला होता. सर्व मॉड्यूल्समध्ये हवामानातील बदलांना सामोरे जाण्याचे प्रॅक्टिकल करत फालीचे विद्यार्थी प्रत्येक शाळेत शेड नेटमध्ये व्यवसाय तयार करतात. ते आधुनिक शेती आणि अग्रगण्य कृषी-उद्योगांच्या ठिकाणी क्षेत्रीय भेटी देतात. वेबिनार आणि व्हिडिओंच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील अनुभवी वरिष्ठांसोबत संपर्क करून अत्याधुनिक नवकल्पना विषयी माहिती मिळवतात. आणि व्यवसायाच्या नवीन योजना तयार करतात आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञाना संबंधी संशोधन करतात.

फाली मध्ये आता ४०,००० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी आहेत आणि २०३२ पर्यंत ही संख्या २,५०,००० पर्यंत वाढविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. फाली मध्ये इंटर्नशिप, शिष्यवृत्ती आणि कृषी उपक्रमांसाठी सुरुवातीचा निधी (सीड फंडिंग) असे विविध सक्रिय माजी विद्यार्थी उपक्रम चालू आहेत.

फाली १० मध्ये अकरा अग्रगण्य कृषी व्यवसाय आणि वित्तीय संस्थांचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा आहे; ज्यामध्ये जैन इरिगेशन, गोदरेज ऍग्रोव्हेट, युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट, एचडीएफसी बँक आणि समुन्नती यांचा समावेश आहे. तसेच २०२४ / २५ ह्या आर्थिक वर्षामध्ये एसबीआय आणि अन्य काही कंपन्या फालीला समर्थन देण्यासाठी वचनबद्ध आहेत.

असोसिएशन फॉर फालीचे बोर्ड मेंबर्स (सदस्य) त्यासाठी अधिकचा पाठपुरावा करत आहेत. जैन इरिगेशनचे व्हाईस चेअर सीईओ अनिल जैन म्हणतात, शेतकरी आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे व्यवसाय निर्माण करण्यासाठी आम्हाला ग्रामीण आणि शहरी यामध्ये संपर्क साखळी निर्माण करावी लागेल. नादीर गोदरेज म्हणतात की फाली मधील तरुणांना शेती आणि शेती व्यवसाय हे त्यांच्या जीवनाचे कार्य म्हणून करण्यासाठी प्रोत्साहित करत राहिले पाहिजे. त्यासाठी आपण फाली माजी विद्यार्थी कार्यक्रम, विशेषत: इंटर्नशिप्स या पुढे ही सुरूच ठेवले पाहिजेत. 

यूपीएलचे अध्यक्ष रज्जू श्रॉफ म्हणतात की हे युवा नायक भारतीय शेतीतील उत्पादकता सुधारतील आणि हवामान बदलाच्या आव्हानांना योग्य रीतीने सामोरे जातील. नॅन्सी बॅरी म्हणतात की या तरुणांमध्ये धगधगती शक्ती आहे; आपण ती योग्य मार्गाने वापरात ठेवू या.

२०१४ पासून फालीचे महाव्यवस्थापक हर्ष नौटियाल यांनी फालीच्या विशेष कामांची माहिती दिली. आम्हाला आमच्या फाली आणि फाली e+ कार्यक्रमांमधील आशयपूर्ण माहितीमध्ये, तसेच ती दूरवर पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा करत राहण्याची गरज आहे आणि भारतीय शेतीमध्ये चांगले परिवर्तन घडवून आणण्यासाठी अधिकाधीक फाली माजी विद्यार्थ्यांची पाठराखण केली पाहिजे.

भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत २०३२ पर्यंत अडीच लाख फाली माजी विद्यार्थी तयार करणे ही एक खूपच लहान संख्या आहे. पण भारतीय शेतीचा कायापालट करणारे नायक म्हणून ही संख्या खूप मोठी आहे.

‘फली’चे ठळक वैशिष्ट्ये

  • प्रत्येक शाळेत पूर्णवेळ कृषी तज्ज्ञांची नेमणूक
  • आठवड्यातून दोनदा शेती आणि शेतीसंबंधित व्यवसायांबद्दल विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह माहिती.
  • शाळांमध्ये प्रत्यक्षात नव्या तंत्राच्या साह्याने विद्यार्थी राबवितात प्रकल्प.
  • ग्रीन हाऊस, ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, विविध औजारे शाळांमध्ये प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध.
  • विद्यार्थ्यांना माती परीक्षण, शेतमाल लागवड ते बाजारपेठबाबत मार्गदर्शन.
  • शेतीसाठी विद्यार्थ्यांना ऊतिसंवर्धित रोप लागवड, सुधारित वाणांचा उपयोग, कमी पाण्यासाठी ठिबक सिंचन, माहिती व तंत्रज्ञान, ग्रीन हाऊस, शेडनेट, विविध कृषी औजारे, दुग्धव्यवसायासाठी जनावरांच्या संकरित प्रजाती व आधुनिक पशुपालन तंत्र, कोल्ड स्टोररेज, शेतमाल साठवणूक, पॅकेजिंग व प्रक्रिया आदीबाबत मार्गदर्शन.
  • विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही अप्रत्यक्ष मार्गदर्शन.
  • उपक्रमाअंतर्गत निवड करण्यात आलेले ९५ टक्के विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील.
  • कृषी शास्त्र, फलोत्पादन, पशुशास्त्र, कृषी यांत्रिकीकरण व कृषी अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया शास्त्र,  कृषी व्यवसाय इत्यादी विषय विद्यार्थ्यांना शिकविले जातात.
टॅग्स :जैन पाइपशेती क्षेत्रशेती