जैविक शेतीकडे वळताना रसायनांचा वापर कमी करून जैविक खते व कीटकनाशकांचा वापर ही आजच्या काळाची गरज आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे सृष्टी संदीप शितोळे चतुर्थ वर्षाचे शिक्षण घेत आहे.
सृष्टी व तिच्या सहकारी विद्यार्थ्यांनी मेटाऱ्हाझियमची निर्मिती केली आहे. ते आत्तापर्यंत नारायणगाव केव्हीके, भुईज कारखाना, सातारा, दौंड, शिरूर, आळंदी अशा विविध ठिकाणी आतापर्यंत पाठविले आहे.
मेटाऱ्हाझियमची वापर प्रामुख्याने हुमणी अळी, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, तुडतुडे इत्यादी किडींच्या नियंत्रणासाठी केला जातो. ऊस, भात, भुईमूग, मका, बाजरी इत्यादी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटाऱ्हाझियमचा वापर फळबागांमध्ये व पालेभाज्यासाठीही करता येतो.
हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी वापरले जाणारे मेटाऱ्हाझियमची हे बुरशीयुक्त जैविक कीटकनाशक आहे. ते हुमणी अळीच्या शरीरात प्रवेश करून उपजीविका करते. त्याच्या संपर्कात आलेली अळी साधारणत १०-१५ दिवसांत मरते. सृष्टीसह सायली भोये, आदित्य संतोष ताकवणे, संकेत कदम, पद्माकर जठार आदी विद्यार्थ्यांनी मदत केली.
मेटाऱ्हाझियम बुरशी वापरताना घ्यावयाची दक्षता
- फवारणी पूर्वी व नंतर १ आठवडा रासायनिक बुरशीनाशक टाळावे.
- कोरड्या हवामानात पिकास भरपूर पाणी द्यावे. तसेच फवारणीनंतर चांगल्या नियंत्रणासाठी दोन दिवस तिसऱ्या प्रहरी पाणी द्यावे.
- मेटाऱ्हाझियमची बॅग थंड जागेत साठवावी.
- बोर्डो मिश्रण, कॉपर ऑक्सिक्लोराइड व इतर रासायनिक बुरशीनाशके वापरू नयेत.
वापरण्याची पद्धत
प्रति एकरी ऊस पिकासाठी ८ किलो 'फुले मेटाऱ्हाझियम' शेणखतात मिसळून पिकास देणे, प्रति लिटर पाण्यात ५ ग्रॅम 'फुले मेटाऱ्हाझियम मिसळून शेत वापश्यावर असताना उसाच्या खोडात आळवणी करणे, १००० ग्रॅम 'फुले मेटाहीनियम २०० लिटर पाण्यात मिसळून सध्या किंवा एच. पी. टी. पंपाने फवारावे.
फायदे
निर्यातक्षम फळे व भाजीपाला यावर विषारी कीटकनाशके यांचे अवशेष व दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त.