भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्याने कारखानदारांनी हंगाम सुरू करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राजकारणाच्या फडातून ते उसाच्या फडाकडे वळल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील १७ साखर कारखाने सुरू झाले आहेत.
येत्या दोन दिवसांत सर्वच साखर कारखान्यांची धुराडी पेटवण्याचे नियोजन केले आहे. उसाची तोड करण्यासाठी साखर कारखाना कार्यस्थळावर विदर्भ, मराठवाड्यातील मजुरांच्या टोळ्या वाहनासह दाखल होत आहेत. त्यांच्या झोपड्या ऊस पट्टयात दिसत आहेत.
विधानसभा निवडणूक आणि अवकाळी पावसामुळे ऊस हंगाम लांबणीवर पडला आहे. याउलट गेल्या दोन आठवड्यांपासून सीमा भागातील बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील उसाची पळवापळवी करीत आहेत. आता विधानसभेचे मतदान झाले आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कारखानदार विधानसभेच्या राजकारणातून कारखाने करीत आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील सहा आणि सांगली जिल्ह्यातील ११ साखर कारखाने सुरू झाले आहेत. ऊसतोडही केली जात आहे. परिणामी, ऊस पट्टयातील शिवारात पुन्हा ऊस तोडणीची धांदल दिसत आहे.
प्रतिकूल हवामान, हुमणीचा प्रादूर्भाव, ढगाळ वातावरण, नदीकाठावरील पूर अशा विविध संकटावर मात करीत शेतकऱ्यांची पिकवलेल्या उसाला तुरे येत आहेत. तुरे आले की वजन घटते. यामुळे शेतकरी कारखान्याला ऊस तातडीने पाठवण्याच्या मानसिकतेत आहे.
ऊस दर जाहीर न करताच हंगाम सुरू
स्वाभिमानी शेतकरी संघटनाही निवडणुकीच्या रिंगणात होती. अजूनही पदाधिकारी त्यातून बाहेर पडलेले नाहीत. ऊस दर जाहीर न करता कारखाने का सुरू केले, अशी विचारणा करणारे नसल्याने कारखानदारही ऊस दर जाहीर न करताच हंगामाला सुरुवात केली आहे. मात्र, अकुंश संघटनेने शिरोळ तालुक्यात आधी ऊस दर जाहीर करा, मगच कारखाने सुरू करा, अशी भूमिका घेऊन ऊस अडवण्याचे आंदोलन करीत आहे.
सुरू झालेले कारखाने
• कोल्हापूर : आजरा, तात्यासाहेब कोरे वारणा, डॉ. डी. वाय. पाटील, शाहू, कागल, ओलम अॅग्री, दालमिया भारत पन्हाळा.
• सांगली : क्रांती कुंडल, राजारामबापू युनिट चार, हुतात्मा किसन अहिर, सोनहिरा, मोहनराव शिंदे, सद्गुरु श्री श्री, श्री दत्त इंडिया, रायगाव शुगर, यशवंत शुगर, श्रीपती शुगर, उदगिरी शुगर.
अधिक वाचा: Us Lagwad : पूर्वहंगामी उसाची लागवड करताय उत्पादन वाढीसाठी असे करा नियोजन