दिवाळी संपल्याने आता साखर कारखान्यांच्या गळीत हंमागाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, विधानसभेचे मतदान आणि त्यामध्ये ऊस तोड मजूर अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होण्यापुढे प्रश्नचिन्ह उभा आहे.
त्यात बहुतांशी साखर कारखानदार विधानसभेच्या रिंगणात असल्याने गुलालानंतर म्हणजेच २५ नोव्हेंबरनंतरच अनेक साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार आहे. यंदा राज्य शासनाने १५ नोव्हेंबरनंतर साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करावेत, असे आदेश दिले आहेत.
दिवाळी संपल्याने १५ नोव्हेंबरपूर्वी ऊस तोड मजूर कारखाना तळावर येतील, असा अंदाज होता. पण, विधानसभेचे २० नोव्हेंबरला मतदान असल्याने मराठवाड्यातील मजूर तिथे अडकून पडणार आहेत.
त्यामुळे हंगाम २५ नोव्हेंबरनंतरच सुरू होणार असून, हंगाम १ डिसेंबरपासून खऱ्या अर्थाने गती घेणार आहे. हंगाम उशिरा सुरू झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पहिल्या दीड महिन्यात आडसाली व सुरुच्या लागणीची तोड होणार आहे.
अटीतटीमुळे मजुरांना कोणी सोडेना
मराठवाड्यात सर्वच ठिकाणी अटीतटीची लढाई आहे. त्यात मनोज जरांगे-पाटील यांच्यामुळे सर्व पक्षीयांनी सावध भूमिका घेतली आहे. आपल्या हक्काचे मजूर मतदार जाऊ नयेत, म्हणून उमेदवारांनी दक्षता घेतली आहे. मतदान झाल्यानंतरच त्यांना आपापल्या जिल्ह्यातून सोडले जाऊ शकते. तसा निरोप साखर कारखान्यांना आला आहे.
गुऱ्हाळघरे जोमात
साखर कारखान्यांचा हंगाम लांबल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यातील गुऱ्हाळघरे जोमात सुरू आहेत. आगामी पंधरा दिवसांत जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे त्यांचे नियोजन आहे.