गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातासमुद्रापार शाडूच्या मातीच्या मूर्तीना मागणी वाढली असून, गोमय मूर्तीलाही भक्तांनी पसंती दिली आहे. या मूर्तीला साऊथ आफ्रिकेतून मागणी आली आहे. गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असून मूर्तीचे बुकिंग पूर्ण झाले आहे. परदेशातही मूर्ती पाठविण्यात आल्या असून गाईचे शेण आणि लाल मातीपासून पर्यावरणपूरक गोमय गणरायालाही सातासमुद्रापार मागणी आहे.
घरच्या घरी करिता येते विसर्जन
- स्थानिकांची या मूर्तीला चांगलीच पसंती आहेच, मात्र या मूर्तीची क्रेझ साऊथ आफ्रिकेपर्यंत पोहोचली आहे. याआधी या मूर्तीला ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या ठिकाणाहून मागणी होती.
- ही मूर्ती पर्यावरणपूरक असून यामध्ये गुलाबजल, हळद आणि सुगंधित द्रव मिश्रित करण्यात आले आहेत. या मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन करता येते. शिवाय ती पर्यावरणपूरक असून विसर्जनानंतर उरलेला गाळ म्हणजेच दर्जेदार नैसर्गिक खत वापरता येते.
- त्यामुळेच पर्यावरणप्रेमी गणेशभक्त अशा मूर्तीना पसंती देत आहेत. साऊथ आफ्रिकेत राहणाऱ्या सोनाली देशपांडे यांनी ही मूर्ती मागवली असून तेथूनही पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी हातभार लावत आहेत.
या मूर्तीची वैशिष्ट्ये
- घरच्या घरी विसर्जन करता येणारी मूर्ती.
- ही मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी आहे.
- देशी गाईचे शेण आणि लाल मातीपासून तयार केलेली सुबक मूर्ती.
- विसर्जनानंतर उरलेला गाळ म्हणजे दर्जेदार नैसर्गिक खत.
- मूर्ती दिसायला आकर्षक आणि सुबक अशी आहे.
- मूर्तीमुळे नकारात्मकता निघून जाते.
गाईच्या शेणापासून मूर्ती तयार करण्याची संकल्पना सुचली, तेव्हा सुरुवातीला शेणाचे फायदे कोणते ही माहिती मिळवली. गाईच्या शेणामुळे नकारात्मकता निघून जाते तसेच गाईचे शेण पाण्यात मिसळल्यास त्या शेणामुळे दूषित पाणी स्वच्छ होण्यास मदत होते - नरेश नागपुरे