Join us

Gardening Tips: तुमचीही कोरफड उन्हाच्या झळांमुळे सुकलीये? मग वापरून पहा या ५ सोप्या टिप्स

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 07, 2024 2:45 PM

उन्हाळ्यात कोरफड सुकू लागल्यास या काही सोप्या पद्धतींचा वापर करून कोरफड वाचवता येऊ शकते..

राज्यात उष्णतेच्या लाटा सुरू झाल्या असून उष्णतेच्या झळांनी बागेतील रोपे सुकू लागली आहेत. ऊन आणि पाण्याचे गणित बिनसलं की गार्डन मधल्या अनेक रोपांना वाचवणं अवघड होऊन बसतं. 

त्वचा, केस व अनेक विकारांवर उपयुक्त असणारी कोरफड घरात कुठल्याही कुंडीत सहज लागते. थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. पण उन्हाळ्यात कोरफड सुकू लागल्यास या काही सोप्या पद्धतींचा वापर करून कोरफड वाचवता येऊ शकते.

१. योग्य कुंडीची निवड

कोरफड जरी कोणत्याही कुंडीत व सहज येऊ शकणारी वनस्पती असली तरी त्याची वाढ नीट होण्यासाठी योग्य कुंडी निवडणे गरजेचे आहे. जर तुमची कोरफड पुन्हा मुळे चुकत असेल तर मोठ्या कुंडीत कोरफड लावावी. यामुळे मुळांना श्वास घेण्यास अधिक जागा मिळते.

२. खताचा योग्य वापर

कोरफडीला वाचवायचं असेल तर त्यात योग्य प्रमाणात खत टाकणं ही गरजेच आहे. यासाठी कोणताही विकत खत न आणता सेंद्रिय पद्धतीचे खत कोरफडीचे आरोग्य चांगले ठेवते.

३. कोवळ्या उन्हात कोरफड ठेवावी

कोरफडीला हिरवेगार व ताजे ठेवण्यासाठी कोरफडीची कुंडी कोवळ्या उन्हात ठेवावी. जर थेट सूर्यप्रकाश येणाऱ्या जागेत कोरफड ठेवत असाल तर कोरफड सुकेल. त्यामुळे जिथे हलका सूर्यप्रकाश आहे अशा जागी कोरफड चांगली उगवेल.

४. पाण्याचे योग्य प्रमाण

उन्हाळ्यात कोरफडीला आठवड्यातून दोन वेळा भरपूर पाणी देण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही रोज थोडे थोडे पाणी देऊ शकता. ज्यामुळे मातीत ओलावा टिकून राहील. कोरफड हे कमी पाण्यात येणारी वनस्पती असल्याने रोज पाणी दिले नाही तरी चालू शकते.

५. योग्य ऊन आणि सावली

कोरफडीला योग्य ऊन आणि सावलीचे प्रमाण गरजेचं आहे. अगदी कडक उन्हात कुंडी न ठेवता हलका सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी कुंडी ठेवता येईल. जर हलके ऊन येईल अशी जागा नसेल तर काही वेळ सूर्यप्रकाशात तर काही वेळेस सावलीत कुंडी ठेवली तरीही कोरफड चांगली राहण्यास मदत मिळू शकते.

टॅग्स :बागकाम टिप्सशेती