Join us

बाजारातून आता गावरान आंबा दुर्मीळ; लोणचं बनविण्यासाठी कैऱ्याही मिळेना?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:46 AM

लोणच्याची चव दुर्मिळ होणार का?

फैजुल्ला पठाण

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडासह परिसरात उन्हाळा लागला की, महिलांकडून आंब्याचे लोणचं घरी तयार करण्याची लगीनघाई सुरू होते. यात गावरान लोणंच घरी तयार केले तर जास्त दिवस टिकते. परंतु, दिवसेंदिवस गावरान आंब्याची झाडे नष्ट होताना दिसत आहे.

त्यामुळे गावरान आंबा हा फार कमी प्रमाणात आढळून येत आहे. परिणामी, लोणचं बनवण्यासाठी लागणाऱ्या गावरान कैऱ्या मिळत नसल्याने मोठी अडचण येत आहे. त्यामुळे अनेकांनी रेडिमेड लोणचं घरी आणण्याचा बेत आखला आहे.

उन्हाळ्यात लोणचं, कुरड्या, शेवया, वडे, खारवड्यांसह पापड घरोघरी तयार केले जाते. परंतु, गावरान आंबा मिळाला नसल्याने लाणचं बनवण्याचे बाकी आहे. ग्रामीण भागातील आमराया नष्ट झाल्यामुळे गावरान आंबा दिसून येत नाही. आठवडी बाजारात गावरान आंब्याच्या कैऱ्या तुरळक प्रमाणात विक्रीला आल्या आहेत. या कैऱ्या खरेदी करून महिला घरीच आंब्याचे लाणचं बनवत आहे.

आम्हाला रेडिमेड लोणचं अजिबात आवडत नाही

उन्हाळ्यात वर्षभरातील वाळवण तयार केले जाते. यात लोणचे, धापोडे, कुरड्या, मुगवड्या, शेवया आदींचा समावेश आहे. प्रामुख्याने घरी तयार केलेले लोणचं आम्ही सर्वजण आवडीने वर्षभर खातो. आम्हाला रेडिमेड लोणचं आवडत नाही. त्यामुळे आता १५ किलो आंबे विकत घेऊन लोणचं बनवणार आहे. - जयश्री अन्वेकर, धावडा.

६० किलोप्रमाणे कैऱ्यांची विक्री

• आता बाजारात देशावरी जातीच्या कैऱ्या दाखल झाल्या असून, महिला ६० रुपये प्रतिकिलोप्रमाणे खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.

• तेथे काही आंबे फोडून देणारेही बसल्याने त्यांना १० रुपये प्रतिकिलोप्रमाणे पैसे द्यावे लागत आहे.

हेही वाचा - सर्व शेतकरी बांधवांच्या मोबाईल मध्ये असावेत असे शेती पिकांसाठी फायद्याचे मोबाईल ॲप्स

टॅग्स :आंबाशेतकरीशेतीबाजार