देगलूर तालुका व परिसरात मागील आठवडाभरापूर्वी वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात आंब्याच्या झाडांना बसला होता. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचे अक्षरशः ढीग पडले होते. त्यामुळे जवळपास ८० टक्के झाडे रिकामे झाली. त्यामुळे देगलूरच्या बाजारपेठेतून यंदा गावरान आंबा गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
बाजारपेठेत उन्हाळ्यात इतर आंब्यांसह गावरान आंब्याची आवकही मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतात, पडीक जमिनीवर असलेल्या गावरान आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचे ढीग पडले होते. त्यामुळे झाडाला एकही आंबा शिल्लक राहिला नाही, तर अनेक ठिकाणी आंब्याची झाडे उन्मळून पडल्याने याचा फटका गावरान आंब्यांना बसला, आंब्याच्या झाडांना फळेच शिल्लक राहिले नसल्याने यंदा गावरान आंबा बाजारातून गायब झाल्याची स्थिती पहावयास मिळत आहे.
फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावरान आंब्याला आता उतरती कळा लागली आहे. आमरस आणि पोळी हा पाहुण्यांच्या पाहुणचाराचा खास मेनू असल्याने पूर्वी घराघरांमध्ये गावरान आंबे पिकविण्यासाठी मोठी लगबग असायची. मात्र दिवसेंदिवस परिस्थिती बदलली जात असून, वातावरणाच्या बदलाचा फटका तर दुसरीकडे उत्पन्नाच्या वाढत्या लालसेपोटी आंब्याच्या झाडाखाली पिके वाढत नसल्याचे कारण पुढे करत आंब्याची झाडे तोडली जात आहेत.
केमिकलद्वारे पिकविणाऱ्या आंब्याची आवक
■ नैसर्गिकरीत्या पिकवून बाजारात विक्रीसाठी आणला जाणारा गावरान आंबा आता हद्दपार होत चालला आहे. केमिकलद्वारे झटपट पिकविण्यात येणारे केशर, बदाम, लालबाग, दशहरी, नीलम या आंब्याची देगलूरच्या बाजार- पेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे.