जून महिना सुरू झाला की, जांभळांची आठवण येऊ लागते. परंतु, यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस व वादळवारे सुरू झाल्याने जांभळाच्या झाडांचा फुलोरा गळून पडला. तसेच वातावरणातील बदलाचा फटकाही जांभळाला बसल्याने मे महिना संपला तरी जांभळे दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे जांभळांची विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना मात्र जांभळाची वाट पाहावी लागत आहे.
आरोग्याच्या दृष्टीने जांभूळ हे फळ चांगले असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी झाडांचे संगोपन करून ती वाढविली आहेत. परंतु, यावर्षी वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आणि वादळामुळे जांभळाचा फुलोरा गळून पडला. त्यामुळे आजमितीस जांभळे बाजारात दृष्टीस पडत नाहीत. दुसरीकडे इमारत बांधकामासाठी जांभळाच्या झाडाची कत्तलही होऊ लागल्याचे काही पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
दिवसेंदिवस वातावरणात बदल होऊ लागल्याने जांभळाचा मौसमही बदलून जात आहे. मे महिना आला की, जांभळे हमखास बाजारात आलेली असतात परंतु, यावेळेस मे महिना संपला आणि जून महिना सुरु झाला तरी जांभळे बाजारात आलेली नाहीत.
फुलोरा गळून पडला
साधारणतः जानेवारी महिन्यापासून जांभळाच्या झाडांना फुलोरा येणे सुरू होते. मे महिन्यात जांभळे परिपक्च होऊन बाजारात येतात. परंतु, वादळीवारे व अवकाळी पावसामुळे झाडांचा फुलोरा गळून पडला. त्यामुळे फळधारणा एकदम कमी झाली. त्यामुळे बाजारात कमी प्रमाणात जांभळे दिसू लागली आहेत. सद्यस्थितीत जांभळाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
जांभळे महाग होऊ शकतात
यावर्षी वादळामुळे जांभळाच्या झाडांचा फुलोरा गळून पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात जांभळाचे उत्पन्न झाले. परिणामी यावर्षी जांभळे महाग होण्याची शक्यता आहे.
जांभळामध्ये औषधी गुणधर्म आहेत. जांभूळ हे अत्यंत पाचक असून, मधुमेही रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे. जांभळे खाल्ल्यास मधुमेह बरा होण्यास मदत होते. जांभळाच्या पानांचा रस व सालीपासून केलेला काढा अतिसाराला प्रतिबंध करतो. जांभळाच्या बियांचे चूर्णही मधुमेहावर उत्तम औषध आहे. डॉ. सन्नाउल्ला खान, वैद्यकीय अधिकारी
जांभळे आरोग्यास चांगली असून, ज्यांना मधुमेहाचा आजार आहे, अशांनी आवर्जुन जांभळे खाणे गरजेचे आहे. दरवर्षी मे महिन्यात जांभळे येतात. परंतु, वातावरण बदलामुळे जांभळे येण्यास उशीर झाला आहे. जून महिन्यात जांभळे येतील, असे दिसते.