सदानंद औंधे
'व्हॅलेंटाइन डे' हा प्रेमदिवस शुक्रवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील हरितगृहातील जरबेरा कार्नेशियन व डच गुलाब या फुलांची मिरजेतून रेल्वेने दिल्लीला निर्यात सुरू आहे.
गेले आठवडाभर मिरजेतून दररोज दीडशे ते दोनशे बॉक्स जरबेरा, कार्नेशियन, डच गुलाब रेल्वेने दिल्लीला जात आहेत. व्हॅलेंटाइनसाठी लाल डच गुलाबाचा दर वधारला आहे.
व्हॅलेंटाइन-डे दिवशी लाल गुलाबाच्या फुलांना तसेच जरबेरा, कार्नेशियन या फुलांना सजावटीसाठी मागणी असते. या दिवशी प्रेमाच्या जिवलग व्यक्तीला गुलाबाचे फूल देण्याची पद्धत असल्याने व्हॅलेंटाइनसाठी लाल गुलाबाचा दर वधारला आहे. दिल्ली परिसरात गुलाबाला मागणी व दर अधिक आहे.
त्यामुळे कार्नेशियन या फुलांनाही ३० रुपये प्रतिनग असा दर मिळत आहे. सांगली जिल्ह्यात मिरज, आष्टा, विटा व कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, कोथळी, नांदणी परिसरातील हरितगृहात जरबेरा, कार्नेशियन, डच गुलाबाचे उत्पादन होते. शेतकऱ्यांच्या शेतातून पॅकिंग होऊन हा माल मिरज रेल्वे स्थानकात पाठविण्यात येतो.
मिरजेतून निजामुद्दीन एक्स्प्रेसने दिल्लीकरांच्या व्हॅलेंटाइन डेसाठी गुलाब पाठविला जात आहे. दररोज रात्री गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून दिल्लीला फुले जात आहेत. उत्तर भारतात थंड हवामान असल्याने फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून दिल्लीला फुले रवाना होत आहेत. दिल्लीत शीतगृहात या फुलांचा साठा करण्यात येतो. दिल्लीत गुलाबाच्या फुलांची मागणी जास्त आहे.
एरव्ही दहा रुपये प्रतिनग दर असलेल्या डच गुलाबाच्या फुलांना प्रेमदिनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा रुपये भाव मिळत आहे. मिरज रेल्वेस्थानकातून दररोज दीडशे बॉक्स गुलाब व जरबेरा दिल्लीला जात आहे. रेल्वेकडून फुलांच्या एका बॉक्सला आकारमानाप्रमाणे अडीचशे रुपये आकारणी होते. रेल्वेतून प्रतिकिलो दर आकारणीची मागणी आहे.
कृत्रिम फुलांची एन्ट्री
गेल्या काही वर्षात व्हॅलेंटाईन-डेसाठी कृत्रिम फुलांचाही वापर सुरू झाला आहे. कृत्रिम फुले स्वस्त असल्याने दिल्ली व इतर मोठ्या शहरांत फुलांची मागणी घटली आहे. पूर्वी मिरजेतून दररोज ४०० बॉक्स फुले निर्यात होत होती. आता केवळ दीडशे बॉक्स फुले निर्यात होत असल्याचे निर्यातदार राजू बागणीकर यांनी सांगितले.