Agriculture Produce GI Taging : एखाद्या भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ठ्यांमुळे, हवामान, संस्कृतीमुळे, एखाद्या उत्पादनात, त्याच्या उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष दर्जा, चव, रंग, वास उतरत असतील, ते वर्षानुवर्ष कायम राहत असतील, तर अशा उत्पादनांची नोंदणी भौगोलिक निर्देशन नोंदणी कार्यालय चेन्नई येथे करून भौगोलिक मानांकन मिळवता येऊ शकते. राज्यातील ३८ शेतीउत्पादनांना आत्तापर्यंत भौगोलिक मानांकन मिळाले आहे. पण ज्या संस्थांच्या मालकीतर्फे मानांकन मिळाले आहेत अशा संस्थाच निष्क्रिय असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
एखाद्या भागातील वैशिष्ट्येपूर्ण उत्पादनासाठी भौगोलिक मानांकन हवे असेल तर एखादी संस्था, उत्पादक संघ, कंपनी किंवा शेतकरी गट पुढाकार घेऊ शकतो. जीआय मानांकन मिळाल्यानंतर अधिकृत वापरकर्ते वाढवण्याची जबाबदारी जीआय मिळवण्यासाठी प्रयत्न केलेल्या मालकी संस्थेने घेणे आवश्यक असते. पण राज्यातील अनेक संस्था याबाबत निष्क्रिय असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, जीआय टॅगिंग मिळालेल्या उत्पादनांना दहा वर्षे इतर प्रदेशातल्या अनधिकृत उत्पादनांपासुन, भेसळ होणे, रास्त किंमतीपेक्षा कमी किंमत मिळणे यासारख्या गोष्टीपासुन संरक्षण मिळते व परत संरक्षण कालावधी वाढवता येतो. यामुळे या प्रदेशातील स्थानिक उत्पादकांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होत असते. पण ३८ पैकी १० उत्पादनांचे अधिकृत वापरकर्ते शून्य आहेत. एका उत्पादनासाठीची आकडेवारी उपलब्धच नाही. तर एका उत्पादनाचे वापरकर्ते केवळ ७ एवढे आहेत.
शासनाच्या योजना
शेतकऱ्यांना जीआय मानांकन मिळाल्याचा फायदा होण्यासाठी कृषी विभाग आणि पणन मंडळाकडून सामायिकपणे काम केले जाते. शेतकऱ्यांनी जागृत व्हावे यासाठी पणन मंडळाकडून ४ योजना राबवण्यात येतात. त्यामध्ये जीआय संदर्भात त्या भागांतील शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन, शेतकरी नोंदणी योजना, मूल्यसाखळी विकास करण्यासाठी वेबसाईट डिझाईन करण्यासाठी आणि जीआय टॅगिंगच्या नावाने प्रदर्शनात स्टॉल उभारणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत.
काय आहेत पर्याय?
जीआय मिळाले म्हणून लगेलच माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागत नाहीत. तर त्यासाठी आपल्या मालाची ब्रँडिंग करावी लागते. त्यासाठी मालकी संस्थांनी त्या उत्पादनाचे अधिकृत वापरकर्ते वाढवून त्यांची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर कृषी प्रदर्शने, कार्यक्रम, यात्रा अशा ठिकाणी या मालाची व्यवस्थित पॅकिंग करून जीआयचे स्टिकर लावून विक्री करता येऊ शकते. जीआय हा एक केंद्र सरकारच्या संस्थेने मान्यता दिलेला विश्वास आहे असं म्हणता येते त्यामुळे विक्री व्यवस्थेत एक वेगळी ओळख आपल्या उत्पादनाची करता येऊ शकते.
कोणत्या उत्पादनाच्या संस्था निष्क्रिय? (ज्या उत्पादनाचे अधिकृत वापरकर्ते शून्य आहेत अशा मालकी संस्था)
- चिन्नोर तांदूळ - भंडारा - भंडारा धान्य उत्पादक संघ
- बहाडोली जांभूळ - बहाडोली जांभूळ शेतकरी उत्पादक गट
- बदलापूर जांभूळ - जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट
- अलिबाग कांदा - अलिबाग पांढरा कांदा उत्पादक संघ
- वसमत हळद - बाळासाहेब ठाकरे हरिद्रा रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटर
- बीड सिताफळ - बालाघाट सिताफळ संघ
- पान चिंचोळी चिंच - पान चिंचोळी पटडी चिंच उत्पादक संघ
- बोरसुरी तुरडाळ - बोरसुरी तुरडाळ उत्पादक संघ
- कास्ती कोथिंबीर - बोरसुरू तुरडाळ उत्पादक संघ
- कुंथलगिरी खवा -