महावितरणच्या वतीने दर महिन्याला वीज ग्राहकांना बिल पाठविण्यात येते. अलीकडच्या काळात बिल भरण्याची सुविधा ऑनलाइनही झाली आहे. त्यामुळे जवळपास निम्म्या ग्राहकांना छापील वीजबिल लागत नाही. अशा ग्राहकांसाठी महावितरणने गो- ग्रीन योजना आणली असून, या अंतर्गत एसएमएस, ई- मेलच्या माध्यमातून ऑनलाइन वीजबिल दिले जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर अशी एकूण जवळपास एक लाख ६० हजारांवर आहे. या वीजग्राहकांना दर महिन्याला महावितरणच्या वतीने वीजबिल पाठविण्यात येते; परंतु, यातील जवळपास निम्मे वीज ग्राहक ऑनलाइन बिल भरतात. तर उर्वरित ग्राहक वीजबिल भरणा केंद्रात बिल भरतात. महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा लाभ जिल्ह्यातील हजारो ग्राहक घेत असून, यामुळे वीजबिलात काही प्रमाणात बचत होऊ लागली आहे. जे ग्राहक ऑनलाइन बिल भरतात. त्यांना छापील बिलाची गरज पडत नाही. अशा ग्राहकांची गो ग्रीन योजनेसाठी नोंदणी करण्यात येत असून, याचा प्रत्यक्ष लाभ वीज ग्राहकांना होताना दिसून येत आहे.
काय आहे गो ग्रीन योजना?
वीजग्राहकांकडे एसएमएस, ई-मेलची सुविधा उपलब्ध असल्यास ग्राहकाने महावितरणला छापील वीजबिलाची कॉपी नको. यासंदर्भात अर्ज करायचा आहे. या योजनेच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने ग्राहकाला वीजबिल पोहोचणार आहे. ज्या ग्राहकाला छापील बिलाची गरज नाही, ते पैसे ग्राहकाच्या वीजबिलातून कमी होतात.
कसा निवडाल पर्याय?
वीज ग्राहकाने छापील वीजबिल नको असल्याचे महिावतरणला कळवायचे आहे. तसेच मोबाइल क्रमांक, ई-मेलही महावितरणला द्यायचा आहे. नोंदणी केल्यानंतर पुढील महिन्यापासूत ग्राहकांचे दहा रुपयांनी कमी वीजबिल येते. त्यानंतर वीजबिल छापील येत नाही. ग्राहकाला वीजबिल ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे.
१२० रुपयांची बचत
वीजवितरण कपंनीच्या वतीने वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे. त्याचबरोबर पर्यावरणाचा हास टाळण्यासाठी महावितरणच्या वतीने गो ग्रीन योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत वीज वीज ग्राहकाचे दर महिन्याला १० रुपये असे वर्षभरात १२० रुपयांची बचत होते. त्यासाठी नोंदणी करावी लागते.
महावितरणच्या वतीने गो-ग्रीन
योजना राबविण्यात येते. वीजग्राहकांनी या योजनेंतर्गत नोंदणी करावी व ऑनलाइन वीजबिल भरणा करावा, संबंधित ग्राहकाला वार्षिक १२० रुपयांची बचत करता येते. महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांना आवश्यक ती माहिती दिली जाते. तसेच सर्व सहकार्य करण्यात येते.
गो-ग्रीन योजनेसंदर्भात जनजागृतीचा अभाव
महावितरणच्या वतीने आणण्यात आलेल्या गो- ग्रीन योजनेसंदर्भात जनजागृतीचा अभाव दिसून येतो. हिंगोली जिल्ह्यात बहुतांश वीज ग्राहकांना या योजनेची माहितीच नाही. जे ग्राहक ऑनलाइन वीजबिल भरणा करतात. त्यांनाही महावितरण छापील बिल देते. यात मात्र वीज ग्राहकांना गो- ग्रीन योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी महावितरणच्या वतीने या योजनेसंदर्भात शहरांसह ग्रामीण भागात जनजागृती करणे गरजेचे आहे..