Join us

गोव्याच्या काजूला मिळाला GI दर्जा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतकऱ्यांना दारे खूली

By मुक्ता सरदेशमुख | Published: October 17, 2023 6:39 PM

GI दर्जा म्हणजे काय? हा दर्जा मिळाल्याने काय होणार‌? जाणून घ्या...

एखाद्या पदार्थावर काजूचा तुकडा असणं केवढं थाटाचं!  केवळ भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध असणाऱ्या गोव्याच्या प्रसिद्ध काजूचा थाट आणखी वाढणार आहे. गोव्याच्या काजूला आता GI टॅग म्हणजेच भौगोलिक संकेत म्हणून मान्यता मिळाली आहे. गोव्याच्या काजू उद्योगाच्या दृष्टीने हे पाऊल असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

गोव्याच्या शेतीचा, संस्कृतीचा आणि भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या पदार्थांची लज्जत वाढवणारा काजू पोर्तूगिजांनी १६ व्या शतकात भारतात पेरला. या पिकाला स्थानिकांनीही स्विकारले. नवीन मातीत काजूची भरभराट झाली. कालांतराने काजूची कोकणात लागवड केली जाऊ लागली. कोकणातही काजू प्रसिद्ध होऊ लागले. कोकणचे काजू म्हणून राज्यभर काजूला मान मिळाला आणि भारत काजूचा प्रमुख निर्यातदार बनला. अनेक देश त्यांच्या खाद्यपदार्थामध्ये काजूचा समावेश करण्यासाठी या बीयांवर अवलंबून आहेत.

माती बदलली की पदार्थाची चव बदलते म्हणतात, तसेच गोव्याच्या मातीतल्या काजूची चवीत काही खासियत असल्याचे अनेक पर्यटक सांगतात.  गोव्याच्या भौगोलिक प्रदेशात तयार होणारा काजू अशी ओळख आता गोव्याच्या काजूला मिळणार आहे. काजूला मिळालेला GI दर्जा म्हणजे काजूचे भौगोलिक सांकेतीकरण.

GI दर्जा म्हणजे काय?

एखाद्या पदार्थाचा दर्जा, स्थान, पत आणि विशिष्ट भौगोलिक प्रदेशांमध्ये असणारी त्या पदार्थाची विशेष ओळख जपण्यासाठी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या पदार्थाच्या प्रमाणीकरणासाठी दिला जाणारा दर्जा म्हणजे भौगोलिक संकेत (GI). त्या पदार्थाला देण्यात आलेला दर्जा किंवा चिन्ह त्या भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधित्व करेल.उदा: गोव्याच्या काजूसाठी दिला गेलेला GI दर्जा विकत घेणाऱ्या ग्राहकाला काजू नक्की गोव्यातीलच असल्याची खात्री पटवून देतील.

GI दर्जा किती वर्षांकरिता वैध असतो?

भौगोलिक संकेत(GI) हा १० वर्षांकरता वैध असतो. दहा वर्षांनंतर हा कालावधी पुन्हा वाढवता येतो.

GI दर्जाचा काजूला काय फायदा?

पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात अनेक परदेशी व आंतरराष्टीय पर्यटक येत असतात. या पर्यटकांमध्ये गोव्याच्या काजूचे प्रचंड आकर्षण आहे. परिणामी मागणी अधिक. वाढत्या मागणीमुळे कोणतेही काजू गोव्याची आहेत असे सांगत विकणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे खरा गोव्याचा काजू कोणता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गोव्याच्या काजूला GI दर्जा मिळाल्याने आता अस्सल गोव्यातलेच काजू कोणते हे ओळखणे सोपे होणार आहे. परिणामी गोव्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची दारे खूली होतील. याशिवाय कुठल्याही इतर प्रदेशातील व्यक्तींवर इतर काजू गोव्याचे म्हणून विकण्यावर चाप बसेल.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीगोवाशेतीबाजार