Godambi : हिवाळ्यात अजिंठा डोंगर रांगेतील हळदा, डकला, गलवाडा, आमसरी, वसई, या भागातील उत्पादित गोडंबीला राज्यभरातून मागणी असते.
सिल्लोड तालुक्यातील शेकडो कोळी-भिल्ल समाजातील व्यक्ती या बिब्बा संकलन व गोडंबी उद्योगात काम करतात.
अजिंठा डोंगररांग पट्ट्यातील गोडंबीमध्ये अधिक प्रथिने, कॅल्शियम, लोह, मिनरल्स असतात. अजिंठा डोंगर हा चुनखडी मिश्रित मातीचा आहे.
या डोंगरातील मातीत अधिक क्षार असल्यामुळे येथील गोडंबीचा गोडवा मध्यप्रदेश व सातपुडा डोंगरातील गोडंबीहून आपली वेगळी चव राखून आहे. इतर गोडंबीपेक्षा अधिक ऊर्जा- कॅलरी यापासून मिळते.
अजिंठा डोंगर भागात वसलेले आदिवासी कोळी व भिल्ल बांधव शेकडो वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने भिलावा, गोटे फोडून त्यातून गोडंबी वेगळी करण्याचे काम करीत आहेत.
बिब्बा फोडण्याचे काम अत्यंत कौशल्यपूर्वक केले जाते. कारण बिब्यातील तेल त्वचेवर लागल्यानंतर जखमा तयार होतात. अत्यंत मेहनतीचे असलेले या कामामुळे आदिवासी बांधवांना दरवर्षी चांगला रोजगार प्राप्त होतो. या गोडंबीला परिसरासह राज्यात चांगली मागणी आहे.
जीआय मानांकनासाठी प्रयत्न
भिलावा, गोटे फोडून त्यातून गोडंबी वेगळी करण्याचे काम करीत आहेत. बिब्बा फोडण्याचे काम अत्यंत कौशल्यपूर्वक केले जाते. कारण बिब्यातील तेल त्वचेवर लागल्यानंतर जखमा तयार होतात. अत्यंत मेहनतीचे असलेले या कामामुळे आदिवासी अजिंठा डोंगरातील गोडंबीला बाजारपेठ व प्रतिष्ठा लाभावी, म्हणून सिल्लोडच्या अभिनव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण पा. पवार यांनी नुकताच केंद्रीय वाणिज्य, उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या चेन्नई येथील 'जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग' संस्थेला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच तेथून तज्ज्ञ येऊन प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे पवार म्हणाले.
भिलावा, बिब्ब्याच्या तेलाचा कॅन्सरवरील औषधात उपयोग होतो. विविध डाय - रंगनिर्मितीसाठीही हे तेल वापरले जाते. अजिंठा पर्वत रांगांमध्ये याचे वृक्ष मोठ्या संख्येने आहे. यामुळे परिसरातील आदिवासी बांधवांना दरवर्षी गोडंबीपासून रोजगार उपलब्ध होतो. याला आणखी चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू केला आहे. -किरण पाटील पवार, अध्यक्ष अभिनव प्रतिष्ठान सिल्लोड