Join us

Godavari Tur : करमाळा तालुक्यातील या शेतकऱ्याने ऊस लागवड रद्द करून घेतले गोदावरी तुरीचे विक्रमी उत्पादन; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 09:06 IST

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील फिसरे गावातील शेतकरी हनुमंत रोकडे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित ‘गोदावरी’ तुरीच्या वाणाचा बागायती मध्ये विक्रमी १९.५० क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील फिसरे गावातील शेतकरी हनुमंत रोकडे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित ‘गोदावरी’ तुरीच्या वाणाचा बागायती मध्ये विक्रमी १९.५० क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेला तुरीचा गोदावरी वाण हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठी लाभदायक ठरत आहे.

मागील दोन-तीन वर्षापासून मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी विशेषतः सोलापूर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या वाणाने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी क्रांती केलेली आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांनी श्री. रोकडे यांच्या शेताला भेट दिली. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी आपली यशोगाथा सांगताना स्पष्ट केले की, पूर्वी तुरीचे उत्पादन फक्त ३ ते ४ क्विंटल प्रति एकर मिळायचे.

मात्र, विद्यापीठाच्या बदनापूर येथील  कृषि संशोधन शास्त्रज्ञ डॉ. किरण जाधव, डॉ. दीपक पाटील आणि डॉ. व्ही के गित्ते यांनी ठरवून दिलेली मानके आणि सुधारित तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन याबरोबरच पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने प्रति एकर १५ ते १९ क्विंटल उत्पादन मिळवता आले.

फिसरे गावातील कृषी योद्धा शेतकरी गट यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शास्त्रज्ञांनी सुधारित तुरी लागवडीसाठी विशेष प्रशिक्षण दिले. आधुनिक शेतीतील नव्या पद्धती, योग्य खते व पाण्याचा व्यवस्थापनाचा वापर करत त्यांनी हे यश संपादन केले.

हनुमंत रोकडे आणि त्यांच्या शेतकरी गटाचे यश संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. आधुनिक शेतीत मार्गदर्शन व योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना केवळ अधिक उत्पादनच नव्हे, तर आर्थिक स्थैर्यही मिळू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

या शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञ व विद्यापीठाचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही असेच मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या यशामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास उत्सुक झाले आहेत.

हनुमंत रोकडे यांचा तुरीच्या पिकासहीत असलेला फोटो सामाज माध्यमावर गाजत असून फेसबुक वरील एका पोस्ट मध्ये त्यांचा फोटो पाहून १० एकर ऊस लागवड करायची रद्द केली. खरोखरच शेतकरी या वाणास उसाला पर्याय म्हणून पाहत आहेत.

पुणे येथील राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त प्रदर्शनात २३ डिसेंबर रोजी केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री माननीय शिवराज सिंह चौहानजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना गोदावरी वाणापासून एकरी १४ क्विंटल पर्यंत उतार घेतल्याचे सांगितले.

या वाणाद्वारे शेतकऱ्यांना साधारणपणे एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठास प्राप्त होत आहे.

गोदावरी वाण हा शेतकरी प्रिय असल्यामुळे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक, उप संचालक यांनी देखील गोदावरी वाणाचा उल्लेख पुसा येथून विकसित राष्ट्रीय पातळीवर बासमतीच्या ११२१ हा जसा देश पातळीवर गाजला होता, त्याची जागा घेवून इतिहास घडवणारा ठरेल अशी शक्यता वर्तवलेली आहे.

माननीय कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि मध्यवर्ती प्रक्षेत्र प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे यांनी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर नव्याने विकसित केलेल्या ८०० हेक्टर क्षेत्रापैकी यावर्षी ८५ हेक्टरवर (सायळा ब्लॉक ३० हेक्टर आणि तरोडा/बलसा ब्लॉक ५५ हेक्टर) सलग गोदावरी वाणाची बीजोत्पादनासाठी पेरणी केली.

संपूर्णतः कोरडवाहू क्षेत्रावर हा वाण अतिशय उत्कृष्ट स्थितीमध्ये विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर बहरलेला होता. याची कम्बाईन मशीनद्वारे काढणी सुरु करण्यात आहे. कोरडवाहू मध्ये सरासरी एकरी ८ ते १० क्विंटल गुणवत्ता युक्त बीजोत्पादन मिळेल.

टॅग्स :तूरपीकशेतकरीशेतीसोलापूरवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठराहुरीऊसशिवराज सिंह चौहान