मारोती जुंबडे
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र बदनापूरने विकसित केलेले गोदावरी (बीडीएन २०१३-४१) तूर या वाणाने महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये आपल्या यशाची छाप सोडली आहे. (Godavari Toor Variety)
गोदावरी नदीप्रमाणेच हे वाणही एका शेतकऱ्याकडून दुसऱ्याकडे पोहोचत आहे. हे वाण शेतकऱ्यांसाठी यशाचा मंत्र ठरत आहे. या संशोधनासाठी डॉ. दीपक पाटील, डॉ. विष्णू गिते, डॉ. किरण जाधव, डॉ. ज्ञानदेव मुटकुळे आणि डॉ. प्रशांत सोनटक्के यांनी मेहनत घेतली आहे. (Godavari Toor Variety)
झपाट्याने विस्तार
सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत या वाणाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, पैठण आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला आहे. शेतकऱ्यांना प्रतिएकर १२ ते १६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असून, काही ठिकाणी हे उत्पादन १९ क्विंटलपर्यंत गेले आहे.(Godavari Toor Variety)
मांडवगण गाव : गोदावरी तुरीचे आगार !
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गाव आता 'गोदावरी तूर गाव' म्हणून ओळखले जात आहे. २०२४ मध्ये या गावात ५०० एकरांहून अधिक क्षेत्रावर गोदावरी तुरीची लागवड करण्यात आली. हलक्या जमिनीत १० क्विंटल आणि भारी जमिनीत १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे.
'बीडीएन २०१३-४१ (गोदावरी) हे वाण विकसित करण्यात आले. कमी कालावधीत अधिक उत्पादन क्षमतेमुळे हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. - डॉ. दीपक पाटील, शास्त्रज्ञ