समीर देशपांडे
कोल्हापूर : देशातील दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य 'गोकुळ' दूध संघाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'गोकुळ'चे विजेपोटी वर्षाला खर्च होणारे तब्बल साडे सहा कोटी रुपये वाचणार आहेत. एकूणच वार्षिक खर्चामध्ये बचत करण्यासाठी 'गोकुळ'ने नव्या वर्षात हे पाऊल टाकले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या 'ओपन अॅक्सेस स्कीम'मधून अशा पद्धतीची सौरऊर्जा निर्माण करून ती वीज मंडळाला पुरवली जाणार असून, त्या बदल्यात वीज मंडळ 'गोकुळ'च्या वीजबिलाचा दर कमी करणार आहे. सध्या दूध संघाला वर्षाकाठी वीजबिलाचा खर्च १३ कोटी रुपये येतो. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या बाबींमध्ये बचत करता येईल याचा विचार पुढे आल्यानंतर वीजबिलाच्या बचतीसाठी सौरऊर्जेचा पर्याय समोर आला. यातून मग सोलापूर जिल्ह्यातील हा प्रस्ताव पुढे आल्यानंतर संबंधित कंपनीशी करार करण्यात आला आहे.
अधिक वाचा: कमी खर्चातील पशुखाद्य अझोला कसा तयार कराल?
यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील दिंडेवाडीजवळ 'गोकुळ'ने १८ एकर जागा खरेदी केली आहे. याच ठिकाणी २०० एकरवर पुणे येथील सार्जन रिअॅलिटी प्रा. लि. ही कंपनी सौरऊर्जा निर्मिती करीत आहे. याच कंपनीच्या मार्फत या सोलरपार्कमधून रोज साडे सहा मेगावॅट वीजनिर्मिती 'गोकुळ' करणार आहे. या ठिकाणी ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून पूर्ण करून देण्यासह जमीन खरेदीची रक्कम असा हा 33 कोटी ३३ लाख रुपयांचा प्रकल्प आहे. यातून निर्माण होणारी वीज वीज मंडळाला पुरविल्यानंतर गोकुळला सध्या प्रतियुनिट येणारा खर्च १० रुपयांऐवजी ३ रुपये येणार असून, ही वार्षिक बचत साडे सहा कोटींवर जाणार आहे. याच हिशोबाने केवळ पाच वर्षामध्ये या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च वसूल होणार आहे. यासाठी राष्ट्रीय डेअरी डेव्हपमेंट बोर्डकडे 'गोकुळ'ने २५ कोटी ४७ लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली असून, त्याचे हप्ते या बचत झालेल्या रकमेतून अदा केले जाणार आहेत.
गोकुळ'च्या दैनंदिन खर्चामध्ये काटकसर करण्यासाठी आम्ही काही गोष्टी ठरवत असताना सौरऊर्जा प्रकल्पाची कल्पना पुढे आली. याबाबत अभ्यास करून या प्रकल्पाची आखणी आम्ही केली आहे. याची निविदा प्रक्रिया झाली असून, ३१ जुलैर्ले २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाऊन ऑगस्ट २०२४ पासून प्रत्यक्षात वीजनिर्मिती सुरू होणार आहे. - अरुण डोंगळे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)