दिनांक ६ ते १० मार्च २०२५ दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे" फुले कृषी-२०२५" हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.
याच प्रदर्शनामध्ये दिनांक ७ ते ९ मार्च २०२५ या कालावधीमध्ये "शेतकरी उत्पादक संस्था (FPO) मेळावा" आयोजित करण्यात आलेला आहे.
या मेळाव्यामध्ये केंद्र शासनाच्या १०,००० शेतकरी उत्पादक संस्था स्थापना व बळकटीकरण योजनेंतर्गत राज्यात स्थापन झालेल्या उत्तम कार्य करणाऱ्या FPO यांचा समावेश असणार आहे.
त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांकरिता FPO संदर्भात संपूर्ण माहिती देणाऱ्या विविध चर्चासत्राचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.
या व्यतिरिक्त या प्रदर्शनामध्ये रासायनिक अवशेष मुक्त कृषीतील नवनवीन शोध, तंत्रज्ञान आणि संशोधन प्रदर्शित केले जाणार आहे.
या उपक्रमांचा उद्देश शेतकऱ्यांना निरोगी आणि शाश्वत पद्धतीचा अवलंब करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि साधनांची माहिती देणे हा आहे.
प्रदर्शनात रासायनिक अवशेष मुक्त कृषि तंत्रज्ञान, जैविक कृषी पद्धती, मृद आरोग्य व्यवस्थापन, रासायनिक तणनाशकांचे आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणारी पद्धती यांची प्रात्यक्षिके दाखवली जातील.
कृषी यंत्र आणि अवजारे याबाबतचे स्टॉल, प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिके आणि याबाबत विद्यापीठांनी केलेले संशोधन याचाही यात समावेश राहील.
शेतीमधील इंटरनेटचा वापर, मोबाईल ॲप, कृषी क्षेत्रातील ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे.
नवउद्योजक आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी तयार केलेले तंत्रज्ञान, अध्यात्मिक/योगिक शेती इत्यादी बाबत देखील या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे. राज्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री देखील इथे करण्यात येईल.
हे भारतातील पहिले रासायनिक अवशेष मुक्त शेती प्रात्यक्षिक व प्रदर्शन असून राज्यातील अस्तित्वात असणाऱ्या FPO तसेच FPO स्थापन करू इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन निश्चितच मार्गदर्शक असणार आहे.
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी "फुले कृषी-२०२५" या प्रदर्शनाचा व "शेतकरी उत्पादक संस्था मेळावा" याचा लाभ घ्यावा असे आव्हान राज्याच्या कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.