कृषी विभागातील कृषी सेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. कृषी सेवकांच्या सध्या असलेल्या 6 हजार रुपये निश्चित वेतनात 16 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.
राज्यातील सततची दुष्काळग्रस्त परिस्थिती हाताळण्यासाठी शासनाने दरमहा २५०० रुपये वेतनावर कृषी सेवक पदाची भरती केली होती. त्यानंतर 2009 मध्ये लागू करण्यात आलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार हे वेतन 6000 रुपये करण्यात आले. कृषी सहाय्यकांची सर्व कर्तव्य व जबाबदाऱ्या कृषी सेवक पार पाडत असल्याने शासनाने हे मानधन यापूर्वी वाढविले होते.
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना व कृषी सेवकांकडून या वेतनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावावर 27 जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट 2023 पासून हा निर्णय लागू होणार असून आता या वेतनात 16 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.