मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ साठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ९ हजार मेगावॅट प्रकल्पाच्या कामाचे लेटर ऑफ ऑर्डर दिले आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असून यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची मागणी आता पूर्णत्वास जाताना दिसत आहे.
दरम्यान, रात्रीच्या अंधारात वन्यप्राण्यांचे हल्ले, विंचू काटा अशा गोष्टींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. रात्री झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रात्री वीज न देता दिवसा वीज देण्यात यावी अशी मागणी मागच्या अनेक वर्षांपासून केली जात होती.
या प्रकल्पामध्ये ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून २५ हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. तर हा प्रकल्प १८ महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या कळात या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होताना पाहायला मिळणार आहे. तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे.
८ लाख पंपाचे केले जाणार वाटप
राज्य सरकारकडून सौरउर्जेवर चालणारे उपकरण (जसे की, कृषीपंप) वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जवळपास ८ लाख पंप शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत. या पंपाचे वाटप लवकरात लवकर करण्याचेही आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. २०१६ मध्ये फडणवीसांनी ही संकल्पना आणली होती. हा सुरूवातीला राळेगण सिद्धी येथे राबण्यात आला होता. त्यानंतर आता हा प्रकल्प राज्यभर राबवला जाणार आहे.