नितीन चौधरी
पुणे : पुणे जिल्हा शेती उत्पादनात कशासाठी प्रसिद्ध आहे, असा साधा प्रश्न विचारल्यास तुमच्या डोळ्यासमोर पुरंदरची अंजिरे, मावळातला आंबेमोहोर, जुन्नरचे टोमॅटो येतात. अंजीर व आंबेमोहोर या दोन उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळालेच आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे अंजीर पिकाला फळाचा दर्जाच नसल्याने त्याचा अद्याप फळपीक विमा योजनेत समावेश करण्यात आलेला नाही.
जिल्हा कृषी विभागातर्फे आता याबाबतचा एक प्रस्ताव कृषी आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून, सरकारची मान्यता मिळाल्यानंतर अंजिराचाही पीक विमा योजनेत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
पुणे जिल्ह्यात सुमारे ६०० हेक्टरवर अंजिराचे पीक घेतले जाते. तसेच संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे यांसारख्या काही जिल्ह्यातही अंजिराचे पीक घेतले जाते. मात्र, हेच अंजीर पिकाला अद्यापही फळाची मान्यता नाही. त्यामुळे केंद्र सरकारने अंजीर पिकाचा फळपीक विमा योजनेत समावेश करण्यात आलेला नाही.
मुळात ज्या पुरंदर तालुक्यात हे पीक घेतले जाते, तो भात पर्जन्यछायेचा आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य असून, येथील शेतकरी अंजिराचे उत्पादन घेत असतात. हे पीक रोग व किडींना संवेदनशील असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागते.
आता जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने याबाबत पुढाकार घेतला आहे. त्यानुसार उपसंचालक विश्वास राव यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक घेण्यात आली.
त्यानंतर या बैठकीचे इतिवृत्त जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखालील संनियंत्रण समितीला सादर करण्यात आले. या पिकाचा विमा योजनेत समावेश करावा, असे निर्देश दिवसे यांनी या वेळी दिले. त्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तांमार्फत राज्य सरकारला पाठवावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
अंजिराचा फळपीक विमा योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात तो तयार करून कृषी आयुक्तांना सादर करण्यात येईल. त्यांच्यामार्फत हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर त्याला राज्य सरकार मान्यता देईल. अंजिराच्या फळपीक विमा योजनेतील समावेशामुळे शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक दिलासा मिळेल. - संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे
मुळात हा शेतकरी अल्प भूधारक आहे. यंदा दुष्काळामुळे अंजीर पीक टँकरवर जगविले जात आहे. नैसर्गिक आपत्तीत फटका बसल्यास आर्थिक नियोजन कोलमडते. त्यामुळे फळपीक विमा योजनेत समावेश झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. - रोहन उरसळ, अंजीर उत्पादक
अधिक वाचा: Borewell Recharge विहीर तसेच कुपनलीका पुनःर्भरणची शास्त्रीय पद्धत