Join us

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर हमीभावाने धान्य खरेदी सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 2:19 PM

यंदा खरीप हंगामातील पिकांचे चांगले उत्पादन येण्यासारखी परिस्थिती असल्याने जिल्ह्यात ११ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी पाठविला आहे.

अरुण बारसकरसोलापूर : यंदा खरीप हंगामातील पिकांचे चांगले उत्पादन येण्यासारखी परिस्थिती असल्याने जिल्ह्यात ११ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी पाठविला आहे.

मंजुरी येताच केंद्र सुरू करण्यात येतील, असे जिल्हा पणन अधिकारी हरिदास भोसले यांनी सांगितले. दरम्यान, सातबारावर ई-पीक नोंद असेल तरच हमी भावात धान्य खरेदी केली जाणार आहे.

जिल्ह्यात यंदा पाच लाखांहून अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे सोयाबीन, तूर, उडीद व मुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस व वाढीसाठी पोषक वातावरण राहिल्याने पिकांची वाढ जोमाने झाली आहे.

काही क्षेत्राला संततधार पावसाचा फटका बसला आहे; मात्र असे क्षेत्र फारच कमी आहे. मूग उडदाची वेगाने काढणी सुरू आहे. सोयाबीनच्या काढणीलाही लवकरच सुरुवात होणार आहे.

चांगल्या उत्पादनामुळे उडीद, मूग पाठोपाठ सोयाबीनच्या बाजारात घसरण होणार असल्याने केंद्र सरकारने हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार आवश्यकतेनुसार जिल्ह्यात ११ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला आहे. मंजुरी व शासनाच्या सूचना येताच हमीभाव केंद्र सुरू करण्यात येतील, असे जिल्हा पणन अधिकारी हरिदास भोसले यांनी सांगितले.

येथे हमीभाव केंद्र- जिल्ह्यात सोलापूर, अक्कलकोट, दुधनी, करमाळा, मानेगाव, मंगळवेढा, नंदेश्वर, मरवडे, पंढरपूर, बार्शी, कुर्डूवाडी या ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.- मूग-८ हजार ६८२ रुपये, उडीद-७ हजार ४०० रुपये, सोयाबीन-४ हजार ८९२ रुपये, तूर-७ हजार ५५० रुपये या हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.

यापूर्वी जिल्ह्यात आठ हमीभाव केंद्रावर धान्य खरेदी केले होते. आता गरजेनुसार तीन केंद्र वाढविण्यात आली आहेत. हमीभाव केंद्र सुरू करण्यास थोडा कालावधी लागेल. मूग, उडीद काढणी सुरू आहे त्यातील मॉइश्चर कमी होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी थोडे थांबावे व हमीभावाने धान्याची विक्री करावी. - हरिदास भोसले, जिल्हा पणन अधिकारी

टॅग्स :बाजारसोलापूरशेतकरीशेतीपीकसोयाबीनतूरमूगखरीप