पुणे : आंब्याचा हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक होताना दिसत आहे. कोकणातील हापूस, पायरी तर मराठवाड्यातील केशर आंब्याची बाजारात मागणी वाढली आहे. त्याचबरोबर तोतापुरी, बदामी, गोटी (गावरान) आंबेसुद्धा ग्राहकांकडून खरेदी केले जात आहेत. शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत येईपर्यंत आंब्याचे दर वाढत असतात म्हणून पणन मंडळाने पुण्यात आंबा महोत्सव आयोजित केला आहे.
दरम्यान, पणन मंडळाकडून आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात कोकण आणि विविध भागांतील शेतकरी आणि आंबा उत्पादक सहभागी होणार आहेत. यामुळे पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून कमी दरात आंबा खरेदीची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही.
कोरोनाची २ वर्षे वगळता कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
चालू वर्षी आंबा महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील तसेच राज्यातील केशर आंबा उत्पादकांबरोबरच जिल्हा परिषदेकडील ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडील काही महिला बचत गटांचाही सामावेश असणार आहे.
दरम्यान, गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पीएमटी बस डेपो शेजारील मोकळ्या जागेत हा आंबा महोत्सव १ एप्रिल पासून ३१ मे २०२४ पर्यंत चालणार असून या वेळेत पुणेकरांना खात्रीशीर, गुणवत्तापूर्ण आणि रास्त दरात आंबा खरेदीची संधी मिळणार आहे.